पहिली लाट पूर्णपणे ओसरली नसतानाच जिल्ह्यात दुसरी लाट धडकली. ही लाट पहिलीच्या तुलनेत अधिक तीव्र स्वरूपाची आहे. हे संकट थाेपविण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपायाेजना केल्या जात आहेत. लाॅकडाऊन असतानाही अनेक लाेक अकारण रस्त्यावर फिरत आहेत. सुरुवातीच्या काळात अकारण फिरणाऱ्यांना दंड आकारण्याची माेहीम हाती घेण्यात आली. शहरासाेबतच ग्रामीण भागातही दंड करण्यात आले. परंतु, त्याचाही फारसा परिणाम दिसून आला नाही. दंड भरूनही अनेक जण पुन्हा अकारण फिरताना आढळून आले. या माध्यमातून काेराेना संसर्ग वाढण्याचा धाेका लक्षात घेऊन अकारण फिरणाऱ्यांची थेट अँटिजन टेस्ट करण्याची संयुक्त माेहीम आराेग्य यंत्रणा, नगर परिषद आणि पाेलीस यंत्रणेकडून हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज चाैक, महात्मा गांधी चौक, गंजगोलाई परिसरात सुमारे १४५१ व्यक्तींची ऑन द स्पाॅट टेस्ट करण्यात आली. यापैकी एक-दाेन नव्हेतर, तब्बल १०१ जणांचा रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. दरम्यान, यापुढेही सदर माेहीम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कारणे तीच, काेणाचा दवाखाना तर काेणाचा भाजीपाला...
रस्त्यावर अकारण फिरणाऱ्या लाेकांकडे पथकाकडून कारण विचारले जाते. परंतु, आजवर कारवाई झालेल्यांपैकी बहुतांश जणांकडून एकसारखीच कारणे देण्यात आली आहेत. काेणी दवाखान्याचे कारण देतो तर काेणी भाजीपाला आणण्यासाठी जात असल्याचे कारण पुढे करीत असतो. खाेलवर चाैकशी केल्यानंतर अनेकांनी चुकीची कारणे दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. अशा लाेकांविरुद्ध दंडात्मक कारवाईचा बडगाही उगारण्यात आला आहे.
शहरामध्ये तीन ठिकाणी स्पाॅट....
नगरपालिका, पाेलीस आणि आराेग्य विभागाने संयुक्तरीत्या शहरातील नेहमी गर्दी असणारे तीन स्पाॅट टेस्टसाठी निश्चित केले आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चाैक, महात्मा गांधी चौक, गंजगोलाई आदी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. पथकाने दंडात्मक कारवाई करण्यासाेबतच संशयितांची अँटिजन टेस्टही केली आहे. टेस्ट केलेल्यांची संख्या १४५१ आहे. यातील १०१ जण काेराेना पाॅझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दुसऱ्या लाटेत किती रिकामटेकड्यांची काेराेना चाचणी करण्यात आली?
१४५१
पाॅझिटिव्ह किती?
१०१
जिल्ह्यात एकूण रुग्ण?
८६९८५
बरे हाेऊन घरी परतले...
८०४७१