मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण
लातूर: कासार सिरशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकसा शिवारात सोयाबीनला पाणी देत असताना मागील भांडणाची कुरापत काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याची घटना घडली.याबाबत शिवमूर्ती माणिकआप्पा उलमुलगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी वैजनाथ उलमुलगे यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसाट करीत आहेत.
अंगणवाडीतील एलईडी टीव्ही चोरीला
लातूर: लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील अंगणवाडीमध्ये लावलेली ३२ इंच एलईडी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली. याबाबत संगीता नागोराव मोमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १७ हजार रुपये एलईडी टीव्हीची किंमत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा नोंद आहे. पुढील तपास पोहेकॉ कांबळे करीत आहेत.
घराचा कडीकोयंडा तोडून पावणेतीन लाखांचे दागिने लंपास
लातूर: शहरातील अजिंक्य मेगासिटी येथील एका घराचा कडीकोयंडा तसेच सेंट्रल कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या,चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण दोन लाख ८१ हजारांचा ऐवज चोरल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अजिंक्य मेगासिटी येथील सिद्धेश्वर उमाकांत आलमले यांचे कुटुंबीय नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी कुटुंबासह घर बंद करून गावी गेले होते. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तसेच सेन्ट्रल कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील चांदी,सोने तसेच रोख रक्कम असा एकूण २ लाख ८१ हजारांचा ऐवज चोरला. शेजारील घराचे कुलूप तोडूनही चोरी केली,असे सिद्धेश्वर उमाकांत आलमले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
लातूर: सार्वजनिक रोडवर मध्यभागी रस्त्यावर वाहन उभे करून लोकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी एम.एच. २४ एटी ०८९१ या क्रमांकाच्या ऑटोचालकाविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सराफा लाईन येथे भररस्त्यात ऑटो उभा केल्याची तक्रार पोहेकॉ संतोष गोसावी यांनी दिली. त्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.