लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक झाले आहे. शाळाही सुरू असून, विद्यार्थी आपल्यासोबतच पालकांचीही काळजी घेत असल्याचे चित्र आहे. घरातील व्यक्ती बाहेर पडत असताना बालके मात्र त्यांना मास्क आणि सॅनिटायझरची आठवण करून देत आहेत.
विद्यार्थी टीव्हीवर आणि मोबाईलवर काॅल करताना मास्क वापरा तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी करण्यात आलेले आवाहन ऐकतात. तसेच दररोज घरातून बाहेर जाणारे आपले आई-वडील मास्क लावतात का, सॅनिटाझरची बाटली सोबत ठेवतात का, असा प्रश्नांचा भडिमार करीत आहेत. आई-वडील घरी आल्यानंतर कोणत्याही वस्तूला हात न लावता सरळ आंघोळ करण्याचा सल्ला शालेय विद्यार्थी पालकांना देत आहेत. त्यामुळे स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेण्यास मदत होत असून, कोरोनाचा यशस्वीपणे सामना करता येत आहे.
प्रत्येक कुटुंबातील बालकांनी आपल्या घरातील सदस्यांना बाहेर जाताना मास्क, सॅनिटायझरची आठवण करून द्यावी, असे आवाहनही शालेय विद्यार्थ्यांनी नागरिकांना केले आहे.
आई, बाबा रोज आम्हाला मास्क वापरण्यास आणि सॅनिटायझरने हात धुण्यास सांगतात. बाबा रोज ऑफिसला जाताना मास्क लावतात. मी स्वत: त्यांना सॅनिटायझर आणि मास्कची आठवण करून देतो.
- शहाजेब मुजिब सय्यद,
विद्यार्थी
आम्ही घराबाहेर जाताना सर्वजण मास्क वापरतो. शाळेतून घरी गेल्यानंतर नियमाने अंघोळ करतो. मास्क, फिजिकल डिस्टन्स, आदी उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या पालकांच्या सूचना आहेत.
- अधिराज दत्तात्रय भोसले,
विद्यार्थी
शाळेत गेल्यानंतर बसण्यासाठी स्वतंत्र बेंच आहेत. आम्ही फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करतो. तसेच मास्क नियमित वापरत असून, सोबतच्या सहकाऱ्यांनाही मास्क वापरण्यास सातत्याने सांगत असतो.
- हर्षवर्धन संतोष देशमुख,
विद्यार्थी
सर्दी, ताप, खोकला आला तर डाॅक्टरकडे जा. सॅनिटायझर लावा, मास्कचा वापर करा, याबाबत आम्हाला शाळेत सांगतात. आम्हीपण आई-वडिलांसोबत कुटुंबीयांना मास्क, सॅनिटायझर, नियमांचे पालन करण्यास सांगतो.
- सृष्टी बुरांडे,
विद्यार्थी
शाळांमध्येही विद्यार्थ्यांची काळजी
जिल्ह्यातील पाचवी ते बारावीचे वर्ग सुरळीत सुरू असून, प्रवेशद्वारावर शालेय विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाते. तसेच मास्क, सॅनिटायझरबाबत वेळोवेळी सूचना केल्या जातात. परिणामी, विद्यार्थीही जागरूक झाले असून, नियमांचे पालन करीत असून, पालकांनाही वेळरसंगी सूचना करीत आहेत.