लातूर : दहावी - बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेला बहुतांश पालकांची सहमती असली तरी त्यांना कोरोनाची चिंता भेडसावत आहे.
लातूर जिल्ह्यातून दहावीसाठी १ लाख ५ हजार ४९६, तर बारावीसाठी ७७ हजार ३६० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत. या मुलांचे आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य असल्याचे सांगून शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही पालकांशी चर्चा केली असता पालकांनीही ऑफलाईन परीक्षेला सहमती दर्शविली आहे. परंतु, त्याचबरोबर कोरोनाची चिंताही व्यक्त केली आहे. उपाययोजना आणि खबरदारी घेण्याचे सुचविले आहे.
शिक्षण मंडळाने घेतलेला निर्णय योग्य असून, विद्यार्थी हित जपणारा आहे. परंतु, सध्या कोरोनाचे संकट मोठे आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा केंद्रांना खबरदारीच्या उपाययोजना व त्यावर लक्ष ठेवायला लावणे गरजेचे आहे. उपाययोजनेची चिंता आहे.
- प्रा. भास्कर मोरे, उदगीर
कोरोनामुळे यंदाच्या परीक्षा ऑफलाईनऐवजी ऑनलाईन घ्यायला हव्या होत्या. परंतु, शिक्षण विभागाने ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर योग्य त्या उपाययोजना करून पालकांना चिंतामुक्त करणे आवश्यक आहे.
- शैलजा मुचाटे, लातूर
परीक्षा केंद्रांवर पालकांची गर्दी होऊ नये. पाल्यांना स्वत:ची काळजी घेण्यासंदर्भात योग्य ती दक्षता घेण्याबाबतचे मार्गदर्शन करावे. परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टन्स असावे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व त्या उपाययोजना करून परीक्षा घेण्यास काहीच हरकत नाही.
- जकीखान कायमखानी, लातूर
कोरोनाची चिंता आहे. सध्या भीती थोडी दूर झालेली आहे. गतवर्षी भीतीपोटीच अकरावीची परीक्षा ऑनलाईन झाली. विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. कोरोना जात असल्याचे वाटत असतानाच पुन्हा रुग्ण वाढत आहेत. तरी खबरदारी घेऊन परीक्षा घ्याव्यात.
- रवींद्र गोसावी, बोरफळ
विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने परीक्षा झाल्याच पाहिजेत. परंतु, कोरोनाची भीती आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र व परिसरात निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. फिजिकल डिस्टन्सनुसार परीक्षार्थींची व्यवस्था करावी. जेणेकरून परीक्षा भीतीमुक्त वातावरणात देता येईल.
- विष्णू मोरे, अहमदपूर
बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक आले आहे. परंतु, सध्या कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने चिंता वाटत आहे. तरीही सर्व उपाययोजना आणि नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यास हरकत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचा फायदाच होणार आहे.
- सुनीता नाडे, लातूर