ऑक्सिजनची वाहतूक करणे आणि वेळेवर पुरवठा होणे याबाबत अनेक समस्या कोरोनाकाळात समोर आल्या आहेत. यासंदर्भाने विचारले असता वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख म्हणाले, केवळ शासकीयच नव्हे, तर सर्वच खाजगी असणाऱ्या ५० खाटांवरील रुग्णालयांना त्यांचा स्वत:चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा करणे बंधनकारक असेल. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या खासगी रुग्णालयांना सुद्धा स्वत:चा ऑक्सिजन प्रकल्प उभा करावा लागेल. याबाबतचे आदेश लवकरच निघतील. त्यासाठी नर्सिंग ॲक्टमध्ये बदल करावा लागला तरी तेही राज्य शासन अध्यादेश काढून करेल, असेही देशमुख म्हणाले.
कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने एकिकडे चिंता असली तरी दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आपण सर्वजण एका कठीण प्रसंगातून जात आहोत. अशावेळी सकारात्मकता आवश्यक असून, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सर्वांनीच धीर दिला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझेशन याकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहनही वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी केले आहे.