नागरसोगा : कोरोनामुळे प्रत्येजण एकमेकांपासून दूर राहत आहे. मात्र, अशा परिस्थितीत मानसिक आधार देण्याची गरज भासत असल्याचे महत्त्वाचे आहे. गावातील एकास कोरोनाचा संसर्ग झाला आणि ऑक्सिजनची पातळी ७० वर पोहोचली होती. अशा वेळी गोळ्या औषधांबरोबर कुटुंबीयांनी आणि मित्रांनी मानसिक आधार दिल्याने बाधित व्यक्तीने ९ दिवसांत काेरोनावर मात केली आहे.
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील दिनकर गांगले यांचे लहान बंधू अनिल गांगले यांना एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. बीपी, शुगर असल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेव्हा ऑक्सिजन पातळी खालावली होती. मात्र, गोळ्या औषधांमुळे ते बरे झाले. दरम्यान, दिनकर गांगले यांच्या अंगात ताप भरला. शुगर, बीपीमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली. तेव्हा कोविड चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आणि स्कोअर २२ वर पोहोचला तर ऑक्सिजन पातळी ७० वर आली. एका भावाच्या उपचारासाठी खर्च झाल्याने आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने संकट निर्माण झाले. तेव्हा त्यांचे मित्र संपत पाटील यांनी मदतीचा शब्द दिला. तेव्हा कुटुंबीयांनीही मानसिक आधार दिला. औषधोपचार आणि मानसिक आधारामुळे दिनकर गांगले यांनी कोरोनावर मात केली आहे.