लातूर : नुकत्याच घोषित झालेल्या उस्मानाबाद येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास कै. भाई उद्धवराव पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी लातूर व उस्मानाबादमधील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी केली आहे.
भाई उद्धवराव पाटील यांनी संसद, विधिमंडळातील आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सामान्य माणसांना न्याय मिळवून दिला. त्यांचे मराठवाड्याच्या उत्कर्षात असणारे योगदान लक्षात घेऊन भाई उद्धवराव पाटील यांचे नाव उस्मानाबादच्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाला द्यावे, अशी मागणी आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून भाई उद्धवराव पाटील यांची स्मृती जपण्याची विनंती करण्यात आली आहे. निवेदनावर ज्येष्ठ नेते ॲड. मनोहरराव गोमारे, उस्मानाबाद येथील एम. डी. देशमुख , प्रसिद्ध विचारवंत डॉ. सोमनाथ रोडे, महाराष्ट्र मुख्याध्यापक फेडरेशनचे अध्यक्ष वसंतराव पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार बेदमुथा, उस्मानाबादचे नगरसेवक शिवाजीराव पंगुडवाले, ज्येष्ठ साहित्यिक सय्यद इफ्तेखार अहमद, सर्जन्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डाॅ. हंसराज बाहेती, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, प्रा. विनोद चव्हाण, आदी विविध क्षेत्रांतील व्यक्तींची नावे आहेत.