तालुक्यातील बहुतांश ठिकाणचे ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा परिषदेच्या सीईओंना निवेदन दिले होते. सोमवारी चाकूर पंचायत समितीला टाळे ठोकण्याचा पवित्रा घेतला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोहोचले असता नायब तहसीलदार प्रकाश धुमाळ, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट उपस्थित होते. येथे पोलीस बंदोबस्त होता. तसेच मनसेचे तालुकाध्यक्ष निरंजन रेड्डी, कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, तुलसीदास माने, गणेश पस्तापुरे आदी उपस्थित होते.
नायब तहसीलदार प्रकाश धुमाळ, पोनि. सोपान सिरसाट यांनी आंदोलनकर्ते व गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांची चर्चा घडवून आणली. तेव्हा डॉ. भिकाणे यांनी मुख्यालयी न राहणाऱ्या ग्रामसेवकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी तसेच घरभाडे वसूल करणाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
तेव्हा बीडीओ लोखंडे यांनी शासनाच्या नियमानुसार ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहिले पाहिजे, असे लेखी आदेश काढले. तसेच यापुढे मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे. मुख्यालयाच्या ठिकाणाहून दररोज जी.आय.एस. उपस्थिती व सेल्फी फोटो पाठविण्याचे आदेश दिले. त्यानंतर मनसेने आंदोलन मागे घेतले.
तसेच तलाठी, कृषी साहाय्यक, शिक्षकांनीही मुख्यालयी राहिले पाहिजे, असे ग्रामसेवक संघटनेचे संघटक प्रशांत राजे, सचिव शिवप्रसाद, कोषाध्यक्ष अमित रोकडे, सल्लागार श्रीकांत मुंडे यांनी म्हटले.