लातूर : शेतीच्या वादाचा न्यायालयाचा निकाल फिर्यादीच्या बाजूने लागल्याने याचा राग मनात धरून एकास जबर मारहाण करण्यात आल्याची घटना सरणवाडी शिवारात घडली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात सोमवारी (दि. ५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी हणमंत निवृत्ती पस्तापुरे (४०, रा. आनंदवाडी, ता. चाकूर) यांच्या शेतीचा वाद न्यायालयात सुरू होता. न्यायालयाचा निकालही त्यांच्या बाजूने लागला. दरम्यान, याचा व मागील भांडणाची कुरापत काढून भुजंग व्यंकटी काळे यांच्यासह अन्य तिघाजणांनी संगनमत करून फिर्यादीस शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी, दगडाने, काठी, कुऱ्हाडीने मारहाण केली. यामध्ये गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय, भांडण सोडविण्यासाठी आई, भावजय आणि मुलगी मध्यस्थी केली असता त्यांनाही काठी-दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आले. शेतात आलास तर जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली, असेही फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. ही घटना २ जुलै रोजी सरणवाडी शिवारात घडली.
याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात चारजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.