लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल हे एका कार्यक्रमासाठी जढाळा येथे शुक्रवारी सकाळी जात होते. दरम्यान, चाकूर तालुक्यातील घारोळा येथील जिल्हा परिषद शाळेला त्यांनी भेट दिली. येथे पहिली ते आठवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. यावेळी अभिनव गोयल यांनी विद्यार्थी संख्या पाहिली. शिक्षकांशी संवाद साधला. मुख्याध्यापक माधवराव आयनुले यांच्याकडून माहिती घेतली. या शाळेत ९ शिक्षक आहेत. त्यापैकी १ पुरुष व २ महिला शिक्षक गैरहजर होते. यावेळी मुख्याध्यापक आयुनले यांना गोयल यांनी पटसंख्या विचारली. त्यावर त्यांना पटसंख्याही सांगता आलेली नाही. त्यावेळी सदर तीनही शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकारी आकाश गोकणवार यांना दिले. हजेरी पटावर त्यांच्या नावासमोरील रकान्यात शेरा मारण्यात आला. त्यानंतर, मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल वडवळ नागनाथ येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट दिली. या शाळेत एकूण १२ शिक्षकसंख्या आहे, तर पाचवी ते आठवीपर्यंतची विद्यार्थी संख्या ४२ आहे. मात्र, केवळ १८ विद्यार्थीच उपस्थित होते. गोयल यांनी मुख्यध्यापक रामकिशन माळी यांच्याकडून माहिती घेतली, त्यावेळी सलग तीन दिवसांपासून गैरहजर राहणारे एक शिक्षक आणि दोन महिला शिक्षिका आढळून आले. त्यावेळी त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. याबाबत सोमवारी गटविकास अधिकारी आकाश गोकनवार यांनी सदर सहा शिक्षकांना शुक्रवारी शाळेत गैरहजर असल्याच्या कारणावरून नोटिसा बजावल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिनय गोयल दौऱ्यावर आले असता, आपण शाळेत गैरहजर होतात. त्यासाठी तुम्हाला निलंबित अथवा त्या दिवसांचे वेतन का कपात करण्यात येऊ नये, असे म्हटले आहे. याचा लेखी खुलासा ४८ तासांत संबंधित कार्यालयाकडे दाखल करावा, असेही या नोटिसीत नमूद केले आहे, असे गटविकास अधिकारी गोकावार म्हणाले.
‘त्या’ सहा गैरहजर शिक्षकांना पंचायत समितीने बजावल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:21 IST