चापोली : चाकूर तालुक्यातील चापोली येथील ग्रामस्थांना दुकाने, घर, मोकळ्या जागांवरील ताबा तीन दिवसांमध्ये काढून घेण्यासाठी प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग, नांदेड यांनी नोटीस दिल्या आहेत. चापोली येथून राष्ट्रीय महामार्ग-३६१ जात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची जमीन राष्ट्रीय महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६चे कलम ३ (डी) अधिसूचना क्र. २०८८ ४ जुलै २०१७ अन्वये संपादन करण्यात आली आहे.
या संपादित केलेल्या जमीन, घर, दुकान यांच्या मावेजाची रक्कम उपजिल्हाधिकारी भूसंपादन यांनी संबंधितांना दिली आहे. चापोली येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ च्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे संबंधित ग्रामस्थांनी संपादित केलेल्या दुकाने, घर, मोकळ्या जागांवरील ताबा हा नोटीस दिल्यापासून ३ दिवसांमध्ये काढून घेण्यासंबंधी प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून गुरुवारी नोटीस देण्यात आल्या आहेत. अन्यथा या जमिनी, घर, दुकाने महामार्गाचे कंत्राटदार ताब्यात घेऊन महामार्गाच्या कामाला सुरुवात करतील, असेही सांगण्यात आले आहे.