कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे मागील वर्षी शाळेची घंटा वाजलीच नाही. यावर्षीही शाळा सुरू करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, ऑनलाइनमुळे मुलांना घरूनच अभ्यास करावा लागत आहे. त्यामुळे वरच्या वर्गातील मुलांची पुस्तके रद्दीत देण्यापेक्षा ती पुन्हा उपयोगाला येतील म्हणून विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षण विभागाच्या वतीने शाळांना कळविण्यात आले आहे. आतापर्यंत अनेक पालकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यात २५१७ शाळांची संख्या असून, ५ लाख ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुस्तके जमा करण्याच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मदत होणार आहे. दरम्यान, विविध शाळांच्या वतीने जुनी पुस्तके जमा करून विद्यार्थ्यांना दिली जात आहेत. या उपक्रमाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
संंपर्क अभियानाद्वारे पालकांशी संवाद
विद्यार्थ्यांना वितरित केलेली पुस्तके शाळेत परत करावी, यासाठी ऑनलाइन पालक मेळावा घेऊन संपर्क अभियान राबविण्यात आले. त्याअंतर्गत ५० टक्के मुलांनी पुस्तके परत केली आहेत, तर ४९ टक्के मुलांनी जमा झालेली पुस्तके घरी अभ्यासासाठी नेली आहेत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मदत होत आहे.
-प्राचार्य गोविंद शिंदे, स्वामी विवेकानंद विद्यालय, लातूर
पुस्तके परत केल्यास अनेकांना मदत...
शाळांनी वितरित केलेली पुस्तके शाळेत परत केल्यास नवीन मुलांना ती वितरित करता येतील. कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन अभ्यास सुरूच आहे. शाळांना पुस्तके जमा करण्याबाबत कळविण्यातही आले आहे. या उपक्रमाला पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, पुस्तके परत केल्यास नवीन मुलांना मदत होईल.
- विशाल दशवंत, शिक्षणाधिकारी