लातूर : राज्यात कोरोना महामारीमुळे सर्व व्यवस्था कोलमडली असताना, जिल्ह्यातील निराधार, अपंग, वृध्द, ज्येष्ठ नागरिक, विधवा अशा अडचणीत असलेल्या नागरिकांना शासनाकडून मिळालेले निराधार योजनेतील अनुदान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून घरपोच वाटण्यात आले आहे. जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार ९४२ निराधारांना अनुदानाचे ६२ कोटी ४१ लाख रुपये घरपोच देण्यात आले.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या १११ शाखांमधून घरपोच सेवा देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान, निराधारांना आधार देण्याचे मोठे योगदान संकट काळात सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दिले असून, अशी सेवा देणारी राज्यातील ही पहिली बँक ठरली आहे. याशिवाय बँकेने शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता यावी, यासाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज, मुलीसाठी शुभमंगल कर्ज, ३ लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज असे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. दरम्यान, दोन वर्षापासून राज्यात कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन कालावधीत निराधारांना बँकेत येऊन पैसे काढण्यासाठी एस. टी., रिक्षा या सेवा बंद असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून घरपोच अनुदान पोहोचविण्याचा निर्णय बँकेने घेतला आणि अनुदानाचे वाटप केले. जिल्हा बँकेच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.