किल्लारी येथील तीर्थक्षेत्र पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. या ठिकाणी होणाऱ्या वार्षिक सप्ताह व यात्रा महोत्सवासाठी कर्नाटक, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात. अकरा दिवसांच्या यात्राकाळात भजन, हरिपाठ, समाज प्रबोधनपर कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम होत असतात. दरवर्षी मोठी यात्रा भरते, तसेच अकरा दिवस विविध मान्यवरांच्या हस्ते महाअभिषेक होत असतो. महाआरतीनंतर भव्य मिरवणुकीनंतर यात्रेची सांगता होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीनिळकंठेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने हा महोत्सव रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच शासन नियमाचे पालन करत या महिन्यातील सप्ताह व यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला असून, या महिन्यात होणारे अभिषेक मंदिराबाहेरील शिवलिंगावर करण्यात येणार आहेत. प्रारंभी कमिटीचे अध्यक्ष शिवाजी मुळजे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष अशोक गावकरे, सुभाष लोहार, मनोहर गवारे, चंद्रकांत बाबळसुरे, प्रकाश पाटील, नामदेव माळवदे, निळकंठ बिराजदार, राजेंद्र जळकोटे, देविदास मिरकले, बिसरसिंग राजपूत, राजकुमार फताटे, लव्हुदाजी बाबळसुरे, अंकुश भोसले, भारत बोळशेटे, भगवान पाटील आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
शासनाचे आदेश येईपर्यंत मंदिर बंदच...
यात्राकाळात मंदिराच्या आत यात्रामूर्ती स्थापना होईल. तसेच प्रतिवर्षाप्रमाणे ईश्वर ढोहाला जाणारा पालकी सोहळा वाहना जाऊन येईल. मंदिरात यात्रामूर्ती स्थापना होईल. मंदिरात दररोजची पूजाविधी सुधाकरराव कुलकर्णी करतील. मंदिर व परिसराची स्वच्छता गुरव समाज करील, असे आवाहन देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.