तालुक्यात १६ जानेवारीपासून कोविड प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालय येथे फ्रंटलाईन वर्कर असलेल्या १ हजार ३३२, आरोग्य कर्मचारी ३८५, ४५ ते ५९ वयोगटातील ५१, ६० वर्षांपुढील ३३७ ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच अंबुलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ५८, औराद शहाजानीत १०७, पानचिंचोली- ९०, हलगरा- ५७, कासारबालकुंदा १७, मदनसुरी- ५८, निटूर येथे १७७ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. एकूण २ हजार ७०१ जणांना लसीकरण झाले आहे. लसीकरणानंतर कुणालाही कुठलाही त्रास झाला नाही. त्यामुळे ही लस सुरक्षित आहे. शासन नियमाप्रमाणे नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्येकाने शासन नियमांचे पालन करावे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात एक हजारपेक्षा जास्त लसींचा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती भाग्यश्री काळे यांनी दिली. लसीकरणासाठी वैद्यकीय अधीक्षक बी.के. सौंदाळे, डॉ. दिनकर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास कदम आदीसह कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
ज्येष्ठांनी लसीकरण करुन घ्यावे...
नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करता येते. तसेच ऑफलाईनही नोंदणी करता येते. ही लस उपयुक्त आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी नोंदणीसाठी आवश्यक ती मदत करावी. नागरिकांनी दवाखान्यात प्रवेश करताना कोरोनाचे सर्व नियम पाळावेत, असेही ते म्हणाले.