लातूर जिल्हा सध्या तिसऱ्या टप्प्यात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या नव्या निर्बंधामध्ये सर्व प्रकारची आस्थापन, दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहणार आहेत. तर आठवड्यातील शनिवार आणि रविवार वीकेंड लाॅकडाउन राहणार आहे. या दाेन दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार कडकडीत बंद राहणार आहेत.
माॅल्स, सुपर शाॅपी, चित्रपटगृहे, नाट्यगृह आणि मल्टीप्लेक्स थिएटर बंद राहणार आहेत. रेस्टाॅरंटस, हाॅटेल्स साेमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमतेनुसार दुपारी ४ पर्यंत सुरू राहतील. दुपारी ४ नंतर पार्सल, हाेम डिलीव्हरी सुरू ठेवता येणार आहे. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, माॅर्निंग वाॅक, सायकलिंग साेमवार ते रविवार पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत राहतील. खासगी आस्थापना आणि कार्यालये साेमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत सुुरू राहणार असून, शनिवार आणि रविवार बंद राहतील़ संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेशही देण्यात आले आहेत.
लग्नसमारंभासाठी ५० ची मर्यादा...
आता लग्न समारंभासाठी ५० व्यक्ती तर अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यादा राहणार आहे. यापूर्वी हीच आकडेवारी लग्न - १०० आणि अंत्यसंस्कारासाठी ५० करण्यात आली हाेती. काेराेनाचे वाढते रुग्ण लक्षात घेत ही संख्या आता ५० टक्क्यांवर आणण्यात आली आहे. बैठका, निवडणूक, सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभांनाही नियम लागू करण्यात आले आहेत. कृषी आणि अनुषांगिक सेवा, कामांना साेमवार ते रविवार दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवता येणार आहे, असेही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.