लातूर: लातूर शहरा बाहेरून जाणाऱ्या नवीन बाह्यवळण मार्ग रस्त्याची कामे आशियाई बँकेच्या निधीतून केली जाणार आहेत.या रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन झाले असून चारपदरी रिंग रोडचे काम याच निधीतून केले जाईल. त्यासाठी प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले असून या बैठकीला लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांची उपस्थिती होती.
लातूर जिल्ह्यातील विविध रस्ते विकास कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अनिल देशमुख, बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, अनिल गायकवाड, उपसचिव बसवराज पांढरे यांच्यासह लातूरचे अधीक्षक अभियंता ए. डी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता दिलीप उकिरडे दूरदश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच रस्ते विकासासाठी निधीची मागणी केली. मागील कामांची थकीत देयके देण्यात यावे, लातूर शहरातून जाणाऱ्या लातूर-नांदेड महामार्गावर शहरात उड्डाणपूल उभारण्यात यावा,लातूर पुणे महामार्गावरील टेंभुर्णी ते लातूर मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे अशीही मागणी केली. तसेच लातूर ग्रामीण मध्ये लातूर रेणापूर रस्ते कामासाठी निधी उपलब्ध करून देणे ,अतिवृष्टीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तरतूद करणे आदी मागण्या पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शहराच्या बाहेरून जाणाऱ्या ६१ किमीच्या नवीन रिंग रोडच्या कामास मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगितले. त्यासाठी ५० किमीचे भूसंपादन झाले आहे. उर्वरित ११ किमीमध्ये रस्ता अस्तित्वात आहे. रिंग रोडचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्य घेण्यात येईल असेही ते म्हणाले.