बालाजी शेषेराव बनसोडे- पाटील (३५, रा. बिहारीपूर, ता. मुखेड, जि. नांदेड, हमु. बिदर गेट, हावगीस्वामी कॉलनी, उदगीर) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, मयत टेम्पोमालक बालाजी बनसोडे पाटील हा मालवाहतुकीचा व्यवसाय करीत होता. तो मंगळवारी निलंगा येथे भाडे घेऊन आला होता. सायंकाळी तो निलंग्याहून उदगीरकडे परतत होता. रात्री ७.३० वा.च्या तो वलांडी येथे पोहोचला असता, पत्नीचा मोबाइलवर फोन आला. तेव्हा वलांडीपर्यंत आलो असून उदगीरला पोहोचत असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, कुटुंबीयांचा संपर्क तुटला.
बुधवारी सकाळी वलांडी- तळेगाव रस्त्याशेजारील वलांडी शेत शिवारात त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. तसेच मालवाहतूक टेम्पो, मोबाइल आणि इतर कागदपत्रेही अज्ञाताने पळविल्याचे दिसून आले. याप्रकरणी मयताचा भाऊ राजेश शेषेराव बनसोडे पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०२ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सी.एस. कामठेवाड हे करीत आहेत.
श्वान पथक, ठसे तज्ज्ञ दाखल...
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निलंग्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
दरम्यान, घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तपासासाठी दोन पोलीस पथके तयार करून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.