अहमदपूर शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढत चालला आहे. शहरालगत नवीन वसाहती निर्माण झाल्या असून, लोकसंख्याही वाढली आहे. पालिकेच्या दप्तरी ५० हजारांची नोंद असली तरी प्रत्यक्षात जवळपास एक लाखाच्या वर शहराची लोकसंख्या असल्याचे सांगितले जात आहे. शहर विस्ताराच्या तुलनेत पालिकेकडे स्वच्छतेसाठी यंत्रणा अपुरी आहे. परिणामी, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडल्याचे दिसून येत आहे. आवश्यक ठिकाणी कचराकुंडी नसल्याने व्यावसायिक कचरा रस्त्यावरच टाकतात. त्यामुळे मोकाट जनावरांचा याठिकाणी वावर वाढलेला आहे. ज्या ठिकाणी कचरा कुंड्या बसविण्यात आल्या आहेत.तेथील कचरा वेळीच उचलण्यात येत नसल्याने कुंड्या उलथून जात आहेत. याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. अहमदपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे म्हणाले,अहमदपूर शहरात ज्या भागात कचरा आहे. तो कचरा तत्काळ उचलण्यात येईल. नाल्यांची सफाई करण्यात येईल.
गटारी तुंबल्याने रस्त्यांवरून वाहते पाणी
अहमदपूर शहरातील टेंभुर्णी रोड मुख्य रस्त्यावर तसेच शहरातील अनेक भागातील नाल्या तुंबल्याने गेल्या अनेक दिवसांपासून घाण पाणी रस्त्यांवरुन वाहत आहे. यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांची गैरसोय होत आहे. अहमदपूर शहरातील टेंभुर्णी मार्गावर नेहमीच मोठी वर्दळ असते. मात्र नाल्याचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी वाढली आहे. शाळकरी मुलांना याचा त्रास होत आहे. वाहनधारकांच्या अंगावर हे पाणी उडत असल्याने अनेकदा वादही झाले आहेत. या भागातील नाल्या तुंबल्याने येथील सांडपाणी रस्त्यांवरून वाहत आहे. नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
कचऱ्याकडे पालिकेचे दुर्लक्ष...
अहमदपूर शहरातील कचरा एकत्रित करून शहराबाहेर टाकण्याची अट असतानाही शहरातील मुख्य रस्ता सोडला तर शहरातील अनेक प्रभागातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पडले आहेत. अनेकांच्या दारात कचरा असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पंधरा दिवसांपासून नगरपालिकेला वारंवार सांगूनही लाईन गल्ली, अण्णाभाऊ साठे नगर भागातील कचरा उचलण्यात येत नाही. तसेच या भागातील नाल्यांची दुरवस्था झाली आहे. गेल्या दोन तीन महिन्यापासून लाईन गल्ली, अण्णा भाऊ साठे नगर भागातील नाल्या उपसल्या नाहीत.
- नासेर सय्यद , अहमदपूर.