महावितरण कार्यालयाकडून मार्चअखेर असल्याने, सक्तीची कडक वसुली सुरू करण्यात आली आहे. थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर बंद करणे, विद्युत पुरवठा खंडित करणे, मीटरचे कनेक्शन कट करणे, मीटर काढून घेऊन जाणे यांसह विविध प्रकारचे उपाय केले जात आहेत. एवढेच नव्हे, तर सक्तीची वसुली केली जात आहे. त्यामुळे ऐन हंगामात विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, म्हणून शेतकरी, वीज ग्राहक व्याजी, उसनवारीवर पैसे काढून थकबाकी भरत आहेत. मात्र, आश्चर्य म्हणले मीटर नसतानाही होनमाळ येथील छाया प्रशांत पाटील यांना तीन महिन्यांपासून नियमीत वीजबिल दिले जात आहे. उलट सदरचे बिल भरण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून तगादा लावला जात आहे. छाया पाटील यांनी घरगुती वीजजाेडणी देण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी कागदपत्रांची पूर्तता करून डिमांड भरले होते. मात्र, त्यांना नियमानुसार वीजजोडणी देऊन मीटर बसविणे आवश्यक होते, उलट मीटर न बसविताच वीजबिल देण्यात आले आहे. या प्रकरणी महावितरणच्या प्रतापाचा पाढाच पालकमंत्री, अधीक्षक अभियंता, ऊर्जामंत्री यांच्याकडे छाया पाटील यांनी निवेदनाद्वारे वाचला आहे.
संबंधितांवर कारवाई करणार...
याबाबत महावितरणचे उपविभागीय अभियंता जावळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले मीटर न बसवता वीजबिल देणाऱ्या सर्वांची चौकशी करून, दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.