निलंगा नगरपालिकेने आतापर्यंत चार कोटी मुद्दल विद्युत बिलाचा भरणा केला आहे. परिणामी, चार वर्षात एकदाही वीज पुरवठा खंडित झाला नाही; मात्र महाविकास आघाडी सरकारने दीड वर्षात एकही रुपयांचा विकास निधी दिलेला नाही. त्याचबरोबर कोरोना महामारी उपाययोजनाकरिता कसलाही निधी न दिल्यामुळे पालिका प्रशासन अडचणीत आले आहे. त्यातच पुन्हा नगरपालिकेचे स्ट्रीटलाईट, बोअरचा वीज पुरवठा ताेडल्याने निलंगा शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या अंधाराचा फायदा घेत चाेरट्यांनी घर फाेडल्याची घटना गत आठवड्यात घडली. आता चोरीच्या घटनात वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे पाण्याची टंचाई जाणवत आहे. तातडीने नगरपालिकेचा वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी उपविभागीय अधिकारी विकास माने यांना निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, इरफान सय्यद गुलजारली, महादेव फट्टे, कौसाबाई नागदे, शंकरआप्पा भुरके, आशा माळी, प्रदीप पाटील, इशरत शफी सौदागर, संपता नाटकर, भगवान कांबळे, रेखा सुरवसे, सविता उजळे, विष्णू ढेरे, पद्मावती पोद्दार, शुभम कांबळे आदी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महावितरणने वीज पुरवठा ताेडला; निलंगा शहरात अंधार दाटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST