रस्ते अपघात कमी करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे यासाठी मंत्रालयाने नवीन प्रणाली विकसित केली आहे. या प्रकल्पांतर्गत लातूर जिल्ह्यात झालेल्या अपघातांची माहिती मोबाईल ॲपच्या माध्यमातून संकलित केली जात आहे. यासाठी सूचना विज्ञान केंद्र, लातूर विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व पोलीस प्रशासनातील तपास अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील १४० हून अधिक कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यांत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी बी. एस. दौलताबाद यांनी दिली.
पोलीस अधीक्षक डॉ. निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण सुरू आहे. तसेच जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यांच्या देखरेखीखाली राष्ट्रीय सूचना- विज्ञान केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रोजेक्टच्या प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी नोडल ऑफिसर म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज गायकवाड, एनआयसीअंतर्गत प्रशिक्षणासाठी मधुरा भोयरेकर यांची रोल ऑऊट मॅनेजरपदी नियुक्ती करण्यात आली. नव्या ॲपच्या माध्यमातून अपघाताची माहिती संकलित करणे सोयीचे ठरत आहे. अपघात झाल्यानंतर तातडीने पोलीस प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन माहिती भरत आहेत. या ॲपद्वारे ब्लॅकस्पॉटबद्दलचा डेटा देखील एकत्रित केला जात असल्याचे दौलताबाद यांनी सांगितले.
मोबाइल अॅपचा होणार फायदा...
अपघातानंतर काही क्षणात अपघाताची माहिती संबंधित यंत्रणेला मिळत आहे. त्यामुळे त्याची कारणे लक्षात घेऊन अपघात कमी कसे करता येतील या संदर्भात उपाययोजना करण्यात येणार आहेत. लातूर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रशिक्षण झाले असून पोलीस कर्मचारी अॅपमध्ये माहिती भरत आहेत. वाहन पडताळणीसाठी पोलीस विभागाकडून आरटीओ यांना अॅपद्वारेच मागणी पाठविली जात आहे. त्यामुळे पोलीस आणि आरटीओ यांचे काम अधिक सोपे झाले आहे.