पूजा अर्जुन शिवपुरे (३०, रा. हरिजवळगा, ता. निलंगा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, वैजनाथ जाधव (रा. होन्नाळी, ता. बसवकल्याण) यांची मुलगी पूजा हिचा विवाह सात वर्षांपूर्वी हरिजवळगा येथील अर्जुन शिवपुरे याच्यासोबत झाला होता. तिला सहा वर्षांची मुलगी आहे. हे दाम्पत्य व्यवसायानिमित्त पुण्यात वास्तव्यास होते. दरम्यान, सासरच्या मंडळींनी संगनमत करून व्यवसायासाठी माहेरहून पैसे आण म्हणून तगादा लावण्यास सुरुवात केली. तसेच सतत मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पूजा हिने बुधवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी मृताचे वडील वैजनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून कासारशिरसी पोलीस ठाण्यात पती अर्जुन शिवपुरे, सासरे बिभिषण शिवपुरे, सासू पद्मावती शिवपुरे, ज्योती व शिवशंकर शिवपुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील एपीआय रेवनाथ ढमाले हे करीत आहेत.