उदगीर : तब्बल ३५ वर्षांपूर्वी उदगीर शहरालगतच्या लोणी माळरानावर होऊ घातलेली एमआयडीसी आता इतिहासजमा झाली आहे. राजकीय मंडळींच्या उदासीनतेमुळे उदगीरच्या विकासाला मोठी खीळ बसलेली असताना नेत्यांची कुरघोडी आजही कायम आहे. उदगीरला मिळालेल्या मंत्रिपदामुळे ३५ वर्षांनंतर दुसऱ्या नवीनच एमआयडीसीला मुहूर्त लागला आहे.
३५ वर्षांपूर्वी उदगीर शहराच्या नांदेड रस्त्यावरील लोणीच्या माळरानावर एमआयडीसी होऊ घातली होती. त्यासाठी लोणी व हकनाकवाडी परिसरातील ६१५ हेक्टर जमीन प्रस्तावित करून भूसंपादनाची कार्यवाहीही झाली होती. या प्रस्तावित जमिनीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उदगीर संपादित क्षेत्र ६१५ हेक्टर या नावाचे दोन मोठे फलक लावण्यात आले होते. आजही हे फलक उभे आहेत. शहरातील राजकीय मंडळींनी औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून होऊ घातलेली एमआयडीसी ६१५ हेक्टरवरून २१५ हेक्टर जमिनीवर व्हावी व यातील ४०० हेक्टर जमीन वगळण्यात यावी, यासाठीचे प्रयत्न करून ४०० हेक्टर जमीन वगळून घेतली. त्यानंतर तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर हे उदगीर दौऱ्यावर आले असताना २१५ हेक्टर जमिनीवरही एमआयडीसी तात्काळ सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे या विभागातील अधिकाऱ्यांनी भूसंपादनाची प्रक्रिया गतिमान केली होती. ही प्रक्रिया सुरू असतानाच राजकीय मंडळी व स्थानिक शेतकऱ्यांनी महामंडळातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून तब्बल २०० हेक्टर जमीन वगळून घेतली. तत्पूर्वी तत्कालीन आमदार गोविंद केंद्रे यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली असताना त्यावेळी त्यांना १२५ हेक्टर ३५ आर. जमिनीवर उदगीरची एमआयडीसी स्थापन करण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लोणी व हकनाकवाडी परिसरात होऊ घातलेली एमआयडीसी रद्द करून तोंडार परिसरातील गट नं. ८१ मधील १४ हेक्टर ८१ आर. जमिनीवर सदरची एमआयडीसी होऊ घातली.
२७ नोव्हेंबर २००५ रोजी शासनाच्या राजपत्रात १४ हेक्टर १७ आर. जमीन उदगीरच्या एमआयडीसीसाठी घेण्यात आल्याची अधिसूचना प्रसिद्ध केली होती. या क्षेत्राची भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच यातील १ हेक्टर ३१ आर. जमीन एन. ए. झाल्याचा कारणावरून वगळण्याचे आदेश येथील भूसंपादन अधिकारी तथा उदगीरचे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ही जमीन वगळून १२ हेक्टर ८६ आर. जमिनीवर उदगीरची एमआयडीसी करण्याची प्रक्रिया भूसंपादन अधिकाऱ्यांकडून पूर्ण करण्यात आली होती.
६१५ चे झाले १२ हेक्टर, तेही इतिहासजमा...
उदगीर येथे ३५ वर्षांपूर्वी होऊ घातलेली एमआयडीसी ६१५ हेक्टरवरून २१५ हेक्टर, त्यानंतर १२५ हेक्टर, तद्नंतर १४ हेक्टर १७ आर. व पुन्हा १२ हेक्टर ८६ आर. जमिनीवर होऊ घातलेली उदगीरची एमआयडीसी आता इतिहासजमा झालेली आहे.
बाळासाहेब जाधव यांच्यानंतर संजय बनसोडे...
उदगीरला तत्कालीन आमदार बाळासाहेब जाधव यांच्यानंतर संजय बनसोडे यांना मंत्रिपद मिळाले आहे. राज्यमंत्री बनसोडे यांनी मंत्रिपदाचा वापर करून उदगीर येथे एमआयडीसी व्हावी, यासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्यमंत्री (उद्योग) यांच्यासमवेत २९ जानेवारी २०२० रोजी बैठक घेऊन उदगीरच्या एमआयडीसीच्या कामास गती प्राप्त करून दिली आहे. १० नोव्हेंबर २०२० रोजी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी घेऊन अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
जबाबदार कोण?
३५ वर्षांपूर्वी ६१५ हेक्टरवर होऊ घातलेली एमआयडीसी मोडीत निघत असताना ते थांबविण्यासाठी का प्रयत्न झाले नाहीत. ही एमआयडीसी झाली असती तर हजारों बेरोजगारांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळाले असते. दिशाहीन बेरोजगारांना आतातरी काम मिळावे म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी एमआयडीसी मंजूर करून आणली असताना काही नेत्यांचे पोटशूळ का उठावे, असा सवाल बेरोजगार युवक गोपाळकृष्ण घोडके यांनी व्यक्त केला आहे.