मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तालुक्यातील २६ गावांतील शेतक-यांना महावितरणने कोणतीही नोटीस न देता कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. नियमाने वीज तोडण्यापूर्वी १५ दिवस अगोदर संबंधित शेतक-यांस नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु, महावितरणने कायद्याकडे दुर्लक्ष करीत गावे अंधारात ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
यावर्षी रब्बीची पिके जोरात असताना वीज तोडण्यात आल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यातच काही गावांतील ट्रान्सफॉर्मर जाळले आहे. अनेक ठिकाणच्या विद्युत तारा, ट्रान्सफॉर्मर धोकादायक स्थितीत आहेत. महावितरण त्याकडे पाहतही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पीकविमा अद्यापही जाहीर झाला नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी कृषी तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, तुळशीदास माने, मारोती पाटील, बाळू बाचपल्ले, धोंडिराम भंडारे, दगडू शेवाळे, बालाजी तोटावळे, जगन्नाथ चाटे, विलास शेवाळे, शंकर पाटील, नंदू सुडे, कृष्णा बेंबडे, हनुमंत तत्तापूरे, माधव कोंबडे, विष्णू बोबडे आदी उपस्थित होते.
शेतक-यांचे प्रश्न सोडविले जातील...
ज्या गावात ट्रान्सफॉर्मरची गरज आहे, तिथे लवकरच ट्रान्सफॉर्मर देण्यात येईल. विजेची जास्तीची आलेली बिले कमी करून दिले जातील. शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे उपविभागीय अभियंता अभिजित अडगुबे यांनी सांगितले.
शासनाने केलेले पंचनामे गृहित धरून त्वरित पीकविमा वाटप करण्यात यावा, अशी मागणी डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केली. दरम्यान, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर मनसेने आपले ठिय्या आंदोलन थांबविले.