लातुरात कृती संगम समन्वय बैठक
लातूर : येथील जि.प.च्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कृती संगम समन्वय बैठक पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रकल्प संचालक संतोष जोशी, देवकुमार कांबळे, अनिता माने, वैभव गुराळे यांची उपस्थिती होती. शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रकारे राबविण्यात येत असतात. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करून गरजूपर्यंत योजना पोहोचवाव्यात, असे आवाहन सीईओ अभिनव गोयल यांनी केले.
श्रीकिशन सोमाणी विद्यालयात व्याख्यान
लातूर : येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालयामध्ये ऑनलाईन शिक्षणातील पालकत्व या विषयावर मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांचे व्याख्यान पार पडले. यावेळी डॉ. चेतन सारडा, भारती गोवंड, कमलकिशोर अग्रवाल, जयेश बजाज, अतुल देऊळगावकर, गिरीश कुलकर्णी, मनोज मुंदडा, अमोल माने, राहुल पांचाळ यांची उपस्थिती होती. पालकांनी वर्तनात विवेक दाखविल्यास मुले आपोआपच शिकतील, असे मत डॉ. मिलिंद पोतदार यांनी व्यक्त केले.
कारची धडक, दोघेजण जखमी
लातूर : रस्त्याच्या कडेने चालत असताना रिलायन्स पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगातील कार क्र. एमएच २४ व्ही ५९३९ ने फिर्यादी व त्याच्या मित्रास जोराची धडक दिली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले असून, फिर्यादी प्रशांत अशोकराव जोजारे यांच्या तक्रारीवरून चारचाकी क्र. एमएच २४ व्ही. ५९३९ च्या चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. देशमुख करीत आहेत.
मुख्य चौकातील सिग्नल सुरू करण्याची मागणी
लातूर : लातूर शहरातील पाच नंबर चौक, राजीव गांधी चौक आदी चौकातील सिग्नल गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. सायंकाळच्या वेळी गर्दी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शहर वाहतूक शाखेने याकडे लक्ष देऊन या दोन ठिकाणचे बंद असलेले सिग्नल सुरू करण्याची मागणी होत आहे.