पावसाळ्यामध्ये साथीचे विविध आजार डोके वर काढतात. लातूर शहरात मागील काही दिवसांत डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही बैठक बोलावली होती. उपमहापौर चंद्रकांत बिराजदार व आयुक्त अमन मित्तल यांचीही या बैठकीस उपस्थिती होती. डेंग्यू संदर्भातील सद्यस्थितीची माहिती महापौरांनी यावेळी घेतली. डेंग्यूचे रुग्ण वाढू नयेत यासाठी महानगरपालिकेच्यावतीने केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात अधिकाऱ्यांना त्यांनी विविध निर्देशही दिले.
डेंग्यूचे रुग्ण वाढू नयेत यासाठी शहरात धूरफवारणी व औषध फवारणी करावी. प्रत्येक घरामध्ये फवारणी करून घ्यावी,असे ते म्हणाले. पालिकेच्यावतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. आरोग्य व स्वच्छता विभागाची भूमिका या काळात अत्यंत महत्त्वाची आहे. पावसाळ्याच्या दिवसांत पाणी साठून राहू नये. खुल्या जागांमध्ये गवत वाढून डासांचा प्रादुर्भाव होऊ नये,यासाठी स्वच्छता विभागाने दक्ष रहावे. डेंग्यूसदृश रुग्ण आढळला तर आरोग्य विभागाने तत्काळ उपचारास प्रारंभ करावा. संशयित रुग्णांच्या तपासण्या केल्या जाव्यात. रक्ताचे नमुने घेऊन डेंग्यूसदृश रुग्णास उपचारासाठी दाखल करून घ्यावे,असे निर्देशही त्यांनी दिले.
शहरातील अनेक रुग्ण खासगी रुग्णालयातून उपचार घेत आहेत. संबंधित रुग्णालयांशी समन्वय साधून डेंग्यूसदृश रुग्णांची माहिती संकलित करावी, असे निर्देशही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या बैठकीत दिले.