उदगीर (जि.लातूर) : नवऱ्या मुलास कॅन्सर व किडनीचा आजार असतानाही त्याच्यासोबत लग्न लावून देऊन फसवणूक केली. तसेच लग्नानंतर बुलेट दुचाकी घेण्यासाठी ३ लाख व प्लॉट खरेदीसाठी २० लाख रुपये घेऊन ये म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला म्हणून पतीसह त्याच्या दहा नातेवाईकाविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नळेगाव रोडवर एसटी कॉलनी भागात राहणाऱ्या पीडितेचा एप्रिल २०२४ मध्ये तिचा जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील तुषार बहिर याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर तिचा ३ लाख रुपये बुलेट दुचाकी घेण्यासाठी व २० लाख रुपये प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये म्हणून शिवीगाळ करून मारहाण करून शारीरीक व मानसीक छळ केला. तसेच तिच्या अंगावरील १३ तोळे सोनं काढून घेण्यात आले.
लग्नावेळी नवऱ्या मुलास कॅन्सर व किडनीचा आजार आहे हे माहीत असताना देखील त्याने व तिचे आई-वडील, दिर यांनी आजार लपवून तिच्यासोबत लग्न लावून देवून फसवणूक केली. तसेच पिडीत विवाहितेचा तीच्या दिराने विनयभंग केला. .याबाबत विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून गुरुवारी दुपारी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात पती तुषार कुंडलिक बहिर, कुंडलिक विठठल बहीर, चंद्रकला कुंडलिक बहीर, शुभम कुंडलिक बहीर, अमोल अर्जुन बहीर, सुनिल बाबासाहेब उगले, अकुंश विष्णु उगले (सर्व रा. जामखेड), प्रफुल्ल पंढरीनाथ बहीर, चुलत दीर (रा. नाहुली), बाबासाहेब रामभाऊ उगले, अशोक लेंडे पाटील (दोघे रा.नायगाव ता. जामखेड) या दहा जणांच्या विरुद्ध फसवणूक, छळ करणे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रायपल्ले ह्या करीत आहेत .