जळकाेट तालुक्यातील सुल्लाळी येथील अंकिता यांचा विवाह मे २०१९ मध्ये लातूर येथील याेगीराज झगडे यांच्यासाेबत रितीरिवाजाप्रमाणे झाला. दरम्यान, अंकिताचे वडील शेतकरी असतानाही त्यांनी लग्नात दहा ताेळे साेने, संसार उपयाेगी साहित्य दिले. अंकिताचा पती मुंबई येथील एका कंपनीत नाेकरी करत हाेता. लग्नानंतर सहा महिने संसाराचा गाडा व्यवस्थित चालला. पती याेगीराज झगडे, सासरा, सासू, दीर यांनी संगनमत करून माेटारसायकल घेऊन ये म्हणून तिचा छळ सुरू केला. परिणामी, अंकिताच्या वडिलांनी ५० हजार रुपये दिले. या काळात काेराेनामुळे लाॅकडाऊन झाले. यातच पतीची नाेकरी गेली. त्यामुळे वडिलांकडून व्यवसाय थाटण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी तगादा लावला. एवढी माेठी रक्कम माझे वडील देऊ शकत नाहीत, असे अंकिताने सांगितले. यातूनच विवाहितेला उपाशीपाेटी ठेवत मारहाण करू लागले. मुलीचा हाेत असलेल्या छळाची कुणकुण वडिलांना लागली. यावर वडिलांनी मुलीला नांदवून घेण्याबाबत विनंती केली. मात्र, विवाहितेचा छळ सुरूच हाेता.
याबाबत महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार दिली असता, पसंत नाहीस म्हणून घराबाहेर काढले. अखेर छळाला कंटाळलेल्या विवाहितेने जळकाेट पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत पतीसह सासरच्या चाैघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला.