राज्यातील खेड्या-पाड्यात कृषी तंत्रज्ञानाचा माेठ्या प्रमाणावर वापर करून, विविध प्रयाेग आपल्या शेतात केले जातात. यातून विविध पिके, भाजीपाला घेत उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाताे. काही शेतकरी वगळता इतर शेतकरी अशिक्षित असतात. अथवा अल्प शिक्षणामुळे त्यांना इंग्रजी भाषा समजत नाही. शेती आणि शेतकऱ्यांच्या नावावर तयार हाेणारे विविध खत, बी-बियाणे, औषधासह शेतीसाठी वापरात येणाऱ्या इतर उत्पादनावर, पॅकिंगवर, गाेणीवर त्याचबराेबर बिलांवर केवळ इंग्रजीचाच वापर केलेला आढळून येताे. त्यात मराठी भाषा कुठेही दिसून येत नाही. परिणामी, खेड्या-पाड्यातील अशिक्षित शेतकऱ्यांची हेळसांड हाेत आहे. यातून औषध, खताचा, बियाणाचा, कीटकनाशकांचा वापर कसा करावा, त्याची मात्र किती असावी, सदर निविष्टांची एक्सपायरी डेट काय आहे? हे इंग्रजी येत नसल्याने समजत नाही. परिणामी, कधी-कधी शेतकऱ्यांकडून चूक हाेते. चुकीचा वापर झाल्याने कष्टाने घेतलेल्या पिकांचे नुकसान हाेते. हे टाळण्यासाठी शासनाने, कृषी विभागाने मराठी भाषेचा वापर करून, माहिती द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी केली आहे.
मराठी भाषेचा वापर सक्तीने करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST