उदगीर : येथील महाराष्ट्र उदयगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या नळेगाव येथील माजिद अलीमसाब बागवान याने भंगार व टाकाऊ साहित्य जमा शेती उपयोगी यंत्र बनविले आहे. त्यातून फवारणी, पेरणी करता येते. त्यामुळे वेळ आणि श्रमाची बचत होते. त्यासाठी त्याला केवळ २० हजारांचा खर्च आला आहे.
महाराष्ट्र उदयगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल या विभागात शेवटच्या वर्षात शिकत असताना माजिद बागवान याला प्रोजेक्टसाठी काही तरी नवीन निर्माण करण्याची कल्पना सुचली. त्यातूनच भंगार व टाकाऊ साहित्य एकत्र करून त्याने शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे यंत्र बनविण्यासाठी पुढाकार घेतला. लोखंडी अँगल, जुन्या दुचाकीचे १५० सी.सी. व ७.५/ ८ एचपीच्या इंजिनचा वापर करून हे यंत्र बनविले. त्यासाठी त्याला २० ते २२ हजार रुपये खर्च आला. १ लिटर पेट्रोलमध्ये ४ एकर जमीन फवारणी होऊ शकते, तर दोन एकर जमीन पेरणी करता येते. पेरणी, फवारणी, दुंडणी, कोळपणी व वस्तूंची वाहतूक आदी शेती कामासाठी हे मिनी ट्रॅक्टर शेतकऱ्यांना किफायतशीर व उपयोगी पडणार आहे. हे ट्रॅक्टरला २०२१ च्या स्पर्धेत सादर करण्यात येणार असून, त्याचे पेटंट मिळविण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती माजिद बागवान याने दिली.
शेतकऱ्यांसाठी उपयोगी यंत्र...
माजिद बागवान हा आमचा हुशार व होतकरू विद्यार्थी आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा त्याने दिली आहे. सतत नवीन काही तरी करण्याची त्याची धडपड, जिद्द व मेहनत आहे. त्यातून भंगार व टाकाऊ वस्तू घेऊन मिनी ट्रॅक्टर बनविले. त्याचा मिनी ट्रॅक्टर हा प्रोजेक्ट यशस्वी झाला असून, तो आम्ही विद्यापीठाकडे पाठविला आहे, अशी माहिती प्रा. ए. बी. कुलकर्णी यांनी दिली.