राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचा स्तुत्य उपक्रम
लातूर : कोरोना महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे ज्यांच्या आई किंवा वडिलांचे कोरोनामुळे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मोफत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या महामारीत लेकरांपासून आई-वडिलांची तर आई-वडिलांपासून लेकरांची ताटातूट होत आहे. त्यामुळे या हृदयस्पर्शी वातावरणात आपणही समाजाचे काही देणं लागतो, या सामाजिक भावनेतून राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे प्रमुख प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी अशा लेकरांना आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे कोरोनाचा आधार घेऊन अनेकांना आर्थिकदृष्ट्या लुटण्याचे प्रकार आपण पाहत व ऐकत आहोत; मात्र राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुल याला अपवाद आहे. पूर्वीपासून या संकुलात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासह त्यांना गणवेश, शालेय साहित्य वाटपही करण्यात येते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, अनाथ विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणे अशा सामाजिक दृष्टिकोनातून या संस्थेची वाटचाल सुरू आहे. आता कोरोना महामारीचे संकट ओढवले आहे. कोरोनामुळे ज्यांच्या आई किंवा वडिलांचे निधन झाले आहे, अशा विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. इयत्ता अकरावी व बारावीतील कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांचा यात समावेश असल्याची माहितीही प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी दिली असून, याचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.