अंबेजोगाई तालुक्यातील माकेगाव येथील दत्तात्रेय देशमुख यांच्या मुलीच्या विवाहासाठी आवश्यक असलेले संसारोपयोगी साहित्य मुरुड येथे २६ जून रोजी खरेदी करण्यात आले होते. सदरील ३५ ते ४० हजारांचे साहित्य खरेदी करून ते पोत्यात भरून वाहनाद्वारे गावाकडे नेण्यात येत होते. दरम्यान, हे भांड्यांचे पोते वाहनातून पडले. देशमुख परिवारातील सदस्या घरी पोहोचल्यानंतर पोते पडल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी परत येऊन रस्त्यावरील प्रत्येक गावात चौकशी करण्यास सुरुवात केली.
हे भांड्याचे पोते तांदुळजा येथील रवी गायकवाड यांना सापडले. त्याने ते घरी घेऊन जाताना सापडल्याचे सांगून कोणाचे हरवले असल्यास घरी येऊन घेऊन जाण्यास सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांनी देशमुख परिवारातील सदस्यास पोते कोणाला सापडले त्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी तांदुळजा येथे येऊन मांजरा कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भिसे यांच्याशी संपर्क साधून सांगितले. त्यानंतर त्यांनी गायकवाड यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी भांड्याचे पोते सापडल्याचे सांगून ते परत दिले.
त्याबद्दल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कामासाठी अरविंद कदम, शरद पवार, अरविंद यांचे सहकार्य लाभल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मांजरा कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर भिसे, अरविंद कदम, शरद पवार, अरविंद कदम, बळीराम झारे, गणेश मोहिते, प्रकाश गायकवाड, आशिष पवार, श्रीराम काळे उपस्थित होते.