लिंबोटीचे पाणी अहमदपूरसाठी ठरतेय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:17 AM2021-01-17T04:17:26+5:302021-01-17T04:17:26+5:30

अहमदपूर : लिंबोटी प्रकल्पातून अहमदपूर शहराला जलवाहिनीद्वारे १४ किमी पाणी येण्यासाठी तब्बल १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यामुळे लिंबोटीचे ...

Limboti water is a mirage for Ahmedpur | लिंबोटीचे पाणी अहमदपूरसाठी ठरतेय मृगजळ

लिंबोटीचे पाणी अहमदपूरसाठी ठरतेय मृगजळ

Next

अहमदपूर : लिंबोटी प्रकल्पातून अहमदपूर शहराला जलवाहिनीद्वारे १४ किमी पाणी येण्यासाठी तब्बल १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यामुळे लिंबोटीचे पाणी अजूनही अहमदपूरकरांना मृगजळ ठरत आहे. तांत्रिक अडचणींमुळे ही स्थिती निर्माण झाल्याची चर्चा आहे.

लिंबोटी प्रकल्पावरून अहमदपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे विद्युत पंप ५ जानेवारी रोजी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यान्वित करण्यात आले होते. हे पाणी येण्यासाठी १० तासांचा कालावधी लागणार असल्याचे अभियंत्यांनी सांगितले होते. शहरातील फिल्टर प्लान्टमध्ये जेव्हा पाणी येईल, तेव्हापासून शहराच्या प्रत्येक भागात दहा दिवसाला पाणी येणार, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले होते; मात्र शहरात अजूनही पाणीच आले नसल्यामुळे लिंबोटीचे पाणी शहरवासीयांसाठी मृगजळ ठरत आहे.

लिंबोटीच्या जलवाहिनीच्या कामात अनेक त्रुटी आढळून येत आहेत, तसेच अनेक ठिकाणी गळती होत आहे. त्यातील सर्वात मोठी गळती वरवटी व सिंदगी या गावादरम्यान असून, त्याठिकाणी गळती थांबविण्याचे काम करण्यात येत आहे, तसेच बसविण्यात आलेल्या एअर वॉलसुद्धा तांत्रिकदृष्ट्या निकामी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अधिक दाबाने पाणी फिल्टर प्लाॅन्टकडे येत नाही. सदर पाणी गुगदळ एमआयडीसीजवळ आले असून, त्यापुढे चढ भाग असल्यामुळे पाणी वर चढत नाही. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सर्व गळती थांबविल्याशिवाय पाणी पुढे चालणार नसल्याचे सांगितले, तसेच चालू असलेला एक पंप ३०० एचपीचा असून, १६८ मीटर उंचीपर्यंत पाणी बाहेर टाकण्याची क्षमता आहे. हा पंप पूर्णपणे कार्यान्वित केल्यानंतर पाणी पुढे येणार असून, तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास मध्येच जलवाहिनी फुटू शकते. सध्या कमी दाबाने मोटार चालविली जात आहे. त्यामुळे पाणी वर चढत नाही. शहरात अजून पाणी आले नाही. सदर कामात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक दोष असून ते काढण्यासाठी तांत्रिक सल्लागार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंते काम करीत आहेत. परिणामी, अहमदपूरकरांना लवकरात लवकर पाणी मिळण्याच्या आशेवरही पाणी फिरले आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

तांत्रिक अडचणींमुळे विलंब...

१९ किमीच्या पाणी पुरवठा जलवाहिनीमध्ये दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती असून, अनेक एअरवॉल सध्या काम करीत नाहीत. त्रुटी काढल्यानंतर आणखीन चार दिवसांनी पूर्ण दाबाने शहरात पाणी येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता विकास बडे यांनी सांगितले.

याबाबत तांत्रिक मार्गदर्शक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच नगर परिषदेचे अभियंते हे परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, येत्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने पंप चालू होऊन शहरात पाणी येईल, असे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.

Web Title: Limboti water is a mirage for Ahmedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.