एमआयडीसी परिसरात १९९० या वर्षांत जिल्हा परिषद शाळेची उभारणी करण्यात आली़ गेल्या तीन वर्षांपासून या शाळेत सर्वच महिला शिक्षिका आहेत़ त्यामुळे नंदादीप उपक्रमाच्या माध्यमातून या शाळेने राज्यभरात ओळख निर्माण केली आहे़ औद्योगिक परिसर असल्याने मागील वर्षांत ४३ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या शिक्षिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली़ यामध्ये मुख्याध्यापिका सुरेखा कोकणे, मीना क्षिरसागर, माधुरी वलसे, वंदना कुलकर्णी, उषा कंदाकुरे, मनिषा महाजन यांचा समावेश आहे़ घरची परिस्थिती नाजूक असलेल्या ३० विद्यार्थ्यांना या शिक्षिकांनी दत्तक घेत त्यांची शैक्षणिक जबाबदारी स्विकारली आहे़ लॉकडाऊनमध्ये काही विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सुविधा नसतानाही प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत त्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न या शिक्षिकांनी केला. यामाध्यामातून कोविड कॅप्टन, कृत्रिपत्रिका, गृहभेटी या उपक्रमांना चालना देण्यात आली आहे़ बहूभाषिक विद्यार्थ्यांना भाषेची अडचण होऊ नये, यासाठी विशेष अभ्यासवर्ग घेतले जात आहेत़ याच प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘उमलती फुले’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले आहे़ औद्योगिक परिसर असल्याने अनेक विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी सोय नाही़ त्यामुळे या शिक्षिकांनी स्वखर्चांतून शाळेत येण्याची व्यवस्था केली असल्याचे शिक्षिकांनी सांगितले.
शाळाबाह्य मुलांसाठी विशेष प्रयत्न...
औद्योगिक परिसरात शाळा असल्याने स्थलांतरित मुले शाळेत येतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळेच्या वतीने विशेष मोहीम राबविली जात आहे. शाळा बंद असल्या तरी प्रत्यक्ष गृहभेटीवर भर देत विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे दिले जात आहेत. नवोपक्रमाच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी घडविण्यावर आमच्या सर्वच शिक्षिकांचा भर राहणार असल्याचे सहशिक्षिका माधुरी वलसे यांनी सांगितले.