जळकोट : उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या पाण्याचा लाभ जळकोट तालुक्यातील काही शेतकऱ्यांना होतो, परंतु सध्या या कालव्यास भेगा पडल्याने पाण्याची गळती होऊन अपव्यय होत आहे. त्यामुळे डाव्या व उजव्या कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतक-यांकडून होत असून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे धाव घेऊन साकडे घातले आहे.
हाळी हंडरगुळी येथील तिरु मध्यम प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे १९७२ मध्ये मातीकाम झाले आहे. या कालव्याचा लाभ जळकोट तालुक्यातील मंगरूळ, वाढवणा खु., डांगेवाडी, घाडगेवाडी, लाळी खु., येवरी, सोनवळा, बोरगाव, एकुर्का, डोंगर कोनाळी यासह परिसरातील १० ते १५ गावांतील शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे या भागातील शेती ओलिताखाली येऊन पीक उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे दोन्ही कालवे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहेत. या कालव्याचे मातीकाम असल्याने त्यास भेगा पडल्या आहेत. त्यामुळे कालव्याद्वारे पाणी सोडल्यानंतर पाण्याची गळती होऊन अपव्यय होत आहे. ही गळती रोखण्यासाठी शेतक-यांकडून सिमेंट काँक्रिटचे काम करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यामुळे वाया जात असलेले लाखो लिटर पाण्याचा शेतीसाठी उपयोग होऊन १० हजार ते १५ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येईल, असे शिष्टमंडळाने सांगितले. जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांच्या नेतृत्वाखालीत शिष्टमंडळात शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगम टाले, महारुद्र पाटील, खादर लाटवाले, मुन्शी नाजमुद्दीन, इम्तियाज शेख आदी होते.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घ्यावे...
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन तिरु मध्यम प्रकल्पाचे दोन्ही कालवे सिमेंट काँक्रिटचे करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. दोन्ही कालव्याबरोबरच तिरु नदीवरील ७ बॅरेजेच्या कामास गती द्यावी, यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक धर्मपाल देवशेट्टे यांनी सांगितले.
तत्काळ सर्व्हे करण्याचे निर्देश...
कालव्यातून पाण्याचा अपव्यय होत असल्याने जवळपास १५ ते २० हजार हेक्टरवरील शेतीस फटका बसत आहे. त्यामुळे सिमेंट काँक्रिटचे कालवे निर्माण करावेत, अशी मागणी करण्यात आली असता पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित विभागाला तत्काळ सर्व्हे करून बांधकाम करण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. लवकरच हे काम करण्यात येईल, असे राज्यमंत्री बनसोडे म्हणाले.