महेश पाळणे
लातूर : आयपीएल क्रिकेटच्या मोसमाला सुरुवात झाली असून, क्रीडा विश्वातील सर्वांत मोठी लीग म्हणून आयपीएल ओळखली जाते. भारत देश क्रिकेटवेडा म्हणून परिचित आहे. त्यातच सध्या कोरोनामुळे सगळे घरातच लॉकडाऊन आहेत. विविध माध्यमांतून मनोरंजन करीत या काळात आपला वेळ घालवीत आहेत. त्यातच आयपीएल २०२१ ला सुरुवात झाली असून, लातूरकरांना ५२ दिवस मनोरंजनाचे साधन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे लातूरकरांनो घरीच बसून क्रिकेटचा आनंद घ्या. कोरोनामुळे प्रशासनाने ‘ब्रेक द चेन’चा अवलंब करीत घरीच बसण्याचा सल्ला दिला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता बाजारपेठ बंद आहेत. त्यातच ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे घरातच बसावे लागणार आहे. नागरिकांसह बच्चेकंपनी घरातच असल्याने ती आपला मोकळा वेळ घालविण्यासाठी विविध माध्यमांचा आधार घेत मनोरंजनाची साधने शोधत आहेत. त्यातच ९ एप्रिलपासून क्रिकेटच्या महासंग्रामला सुरुवात झाली आहे. क्रिकेटवेडे याची आतुरतेने वाट पाहत होते. जवळपास ५२ दिवस याद्वारे मनोरंजन होणार असून, याअंतर्गत ६० सामने होणार आहेत. २० षटकांचे सामने असल्याने चौकार, षटकारांची आतषबाजी मनोरंजन करणारी ठरणार आहे. या स्पर्धेत आठ संघ असून, ५२ दिवसांपैकी ११ दिवस दोन सामने होणार आहेत. दोन सामन्यांच्या दिवशी नागरिकांचे दुपारपासून आठ तासांचे मनोरंजन, तर एक सामना असलेल्या दिवशी चार तासांचे मनोरंजन होणार आहे. त्यामुळे लातूरकरांनो घरीच बसा आणि क्रिकेटचा आनंद घ्या आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करा.
मुंबई इंडियन्स ठरतोय आवडता संघ...
या स्पर्धेत आठ संघ असले तरी प्रत्येक संघ प्रतिस्पर्धी संघाशी दोन- दोन सामने खेळणार आहे. यातच महाराष्ट्राची राजधानी असलेला मुंबई इंडियन्सचा संघ तगड्या खेळाडूंमुळे आवडीचा संघ ठरतोय. गतविजेता असलेला मुंबईचा संघ यंदाही विजेतेपद पटकविणार, अशी आशा चाहत्यांची आहे.
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा हिरमोड...
९ एप्रिलपासून सुरू झालेली ही स्पर्धा ३० मेपर्यंत चालणार आहे. याच काळात दहावी, बारावीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आयपीएलचा रोमांच अनुभवता येणार नाही. घरच्या घरीच अभ्यासाला वेळ द्यावा लागणार असल्याने त्यांचा मात्र हिरमोड होणार आहे.