लातूर : गत २० वर्षानंतर पहिल्यांदाच यंदाचा जुलै महिना अनेकांसाठी तापदायक ठरला आहे़ परिणामी, लातूरकरांना आता आराेग्य सांभाळावे लागणार असून, गत दाेन दशकात पहिल्यादाच रेकाॅर्डब्रेक तापमान नाेंदविले गेले आहे़ सध्या लातूर जिल्ह्यातील तापमानाचा पारा ३५ अंशावर गेल्याने नागरिक घामाघूम झाले आहेत़ याचा खरिपाच्या पिकांवर परिणाम हाेत आहे़ गेल्या दाेन आठवड्यानंतर काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे़
यंदा उत्तम पावसाळा असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले हाेते़ मात्र, लातूर जिल्ह्यात मृगाच्या मुहूर्तावर दमदार पावसाने हजेरी लावली़ याच पावसाच्या भरवशावर जवळपास ७० टक्के शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या आहेत़ मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने अद्यापही २५ ते ३० टक्के पेरण्या खाेळंबल्या आहेत़ सध्याला तापमानातील उकाडा वाढल्याने नागरिकही हैराण झाले आहेत़
सरासरी तापमानात सहा अंशाची वाढ
गत दहा वर्षात जुलै महिन्यात नाेंदविण्यात आलेल्या तापमानाची आकडेवारी पाहिली असता, २०२१ मध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक तापमानाची नाेंद झाली आहे़ जून २०२१ मध्ये हेच सरासरी तापमान ३० ते ३२ अंशावर हाेते़ जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरासरी तापमानात सहा अंशानी वाढ झाली आहे़ दिवसा कडक उन्हाचा चटका जाणवायला लागला आहे़ तर वातावरणातील दमटपणामुळे उकाडा जाणवायला लागला आहे़
तापमानात वाढ
गत २० वर्षातील तापमानाची आकडेवारीवरुन नजर टाकली असात, यंदाचा जुलै महिना तापदायक ठरला आहे़ लातूर जिल्ह्यातील तापमानाची नाेंद ३१ अंशावर झाली आहे़ यंदा पहिल्यांदाच माेठ्या प्रमाणावर वातावरणात गरमी दिसून येत आहे़ गत दाेन आठवड्यांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने वातावरणात उकाडा जाणवत आहे़
- मुक्रम नाईकवाडे, हवामान केंद्र, औराद
आराेग्य सांभाळा
काेराेनाची दुसरी लाट आता ओसरत आहे़ बाधित रुग्णांचा आकडाही दिवसेंदिवस कमी हाेत आहे़ अशातच तापमानातील बदल आराेग्यावर परिणाम करणारा आहे़ उकाडा जाणवत असल्याने आराेग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे़ अशा वातावरणात बाहेर फिरल्याने डाेकेदुखी, अंगदुखीचे प्रकार समाेर येत आहेत़ अशा स्थितीत प्रत्येकाने आराेग्य सांभाळले पाहिजे़
- डाॅ़ ओमप्रकाश कदम, उदगीर
हा आठवडा असाच तापणार
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार पावसाने हजेरी लावली़ त्या नंतर जवळपास तीन आठवडे पावसाने हुलकावणी दिली़
यातून वातावरणात झालेल्या बदलामुळे उकाडा वाढला़ परिणामी, काही ठिकाणी खरिपाचे पीक काेमजून जात आहे़ तर येणाऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत़