लातूर : लातूरकर नेहमीच चांगल्या माणसाचे, कामाचे कौतुक करतात. त्यामुळे लातूर जिल्ह्यात काम करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्साह येतो. एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर लातूरकरांकडून त्याला निरोप नव्हे तर त्याने केलेल्या चांगल्या कामाचा गाैरव केला जाताे, असे प्रतिपादन लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे यांनी केले.
लातूर येथील जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे वर्ग - २ अधीक्षक राजेंद्र ढाकणे यांची पुणे येथील शिक्षण संचालक कार्यालयातील माध्यमिक विभागात अधीक्षक म्हणून बदली झाल्याबद्दल, वर्षा मनाळे यांची तहसीलदारपदी पदोन्नती झाल्याबद्दल, लातूर पंचायत समितीतील अंकुश शिंगडे यांची लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागात वर्ग - २ अधीक्षकपदी बदली झाल्याबद्दल या तिघांचाही डॉ. मोरे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव, ॲड. नामदेवराव सोनवणे, प्राचार्य डी. एन. केंद्रे, सहाय्यक शिक्षण उपसंचालक ज्ञानेश्वर मोरे, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील प्रशासन अधिकारी प्रमोद पवार, वेतन पथकाचे अधीक्षक संजय क्षीरसागर, अशोक कदम उपस्थित होते.
यावेळी डॉ. मोरे म्हणाले, शिक्षण क्षेत्रात काम करताना नेहमी ताणतणाव येत असतो. त्यामुळे या क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या तब्येतीची काळजी घेऊन या क्षेत्राला न्याय द्यावा. ढाकणे हे आपल्या सेवेबरोबरच तरुणांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करतात. ते आता शिक्षण संचालक कार्यालयात रुजू होत असल्याने राज्याला एक सक्षम अधिकारी मिळाला असल्याचेही डॉ. मोरे यांनी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तिघांचाही सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दयानंद कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक संयोजक मदन धुमाळ यांनी केले. यावेळी संयोजक आदिनाथ मुसळे यांच्यासह जिल्हाभरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.