लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : लातूरची कुस्ती जगभर प्रसिद्ध आहे. अनेक दिग्गज मल्लांनी लातूरचे नाव उज्ज्वल केले आहे. आता लातूरच्या कुस्तीला नवसंजीवनी मिळणार असून, खेलो इंडिया अंतर्गत लातूरला कुस्ती प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले असून, याचा लाभ जिल्ह्यातील नवोदित कुस्तीपटूंना होणार आहे. त्यामुळे लातूरची कुस्ती पुन्हा चमकेल, यात शंका नाही.
खेलो इंडिया अंतर्गत महाराष्ट्रासह एकूण ७ राज्यांकरिता केंद्र शासनाने विविध खेळानुसार केंद्र स्थापण्यास बुधवारी मंजुरी दिली आहे. या अंतर्गत लातूरला कुस्ती केंद्र स्थापन होणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने देशात १ हजार खेलो इंडिया केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत लातूरला कुस्ती केंद्र मंजूर झाले आहे. लातूर जिल्ह्यातून कुस्तीसह बॅडमिंटन व बॉक्सिंग या तीन खेळ प्रकारांचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले होते. यातील लातूरचा इतिहास बघता कुस्तीला प्राधान्य दिले असून, पहिल्या टप्प्यात कुस्ती खेळाला मंजुरी मिळाली आहे. एकंदरित, नव्याने होणाऱ्या या कुस्ती प्रशिक्षण केंद्रामुळे लातूरच्या कुस्तीला आयाम मिळणार आहे.
पालकमंत्र्यांचे विशेष प्रयत्न...
जिल्हा संकुल समितीच्या अध्यक्षपदी शासनाने पालकमंत्र्यांची नियुक्ती केली होती. या अंतर्गत लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी अध्यक्षपद स्वीकारताच सुरुवातीलाच याबाबत निर्देश दिले होते. कुस्ती खेळाला इतिहास आहे. हरिश्चंद्र बिराजदार मामा, अर्जुनवीर काका पवार, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते गोविंद पवार, उपमहाराष्ट्र केसरी शैलेश शेळके आदी मल्लांनी लातूरचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे लातूरच्या कुस्तीला आता अधिक बळकटी मिळणार आहे. पालकमंत्र्यांनीही या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून याकामी विशेष प्रयत्न केले आहेत.
१० लाखांचा निधी...
या योजनेंतर्गत एकूण १० लाखांचा निधी जिल्ह्याला मिळणार असून, पायाभूत सुविधा व क्रीडा साहित्यासाठी ५ लाख तसेच प्रशिक्षण व दैनंदिन गरजेसाठी ५ लाख असा एकूण १० लाखांचा निधी मिळणार आहे. शासनाचे प्रशिक्षक व माजी आंतरराष्ट्रीय तथा राष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शकामार्फत जिल्ह्यातील खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण याद्वारे मिळणार आहे.
नवोदित मल्लांना आधार...
या योजनेमुळे शहरासह ग्रामीण भागातील मल्लांना आधार मिळणार आहे. तंत्रशुद्ध प्रशिक्षण उत्कृष्ट मार्गदर्शकाच्या मार्फत मिळणार असून, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट मल्ल तयार होण्यासाठी मदत मिळणार आहे.
शालेय, महाविद्यालयीन मल्लांना प्रशिक्षण...
या योजनेंतर्गत शालेय तथा महाविद्यालयीन कुस्तीपटूंना उत्कृष्ट प्रशिक्षण मिळणार आहे. जिल्ह्याच्या कुस्तीच्या विकासासाठी ही योजना महत्वाकांक्षी आहे. निधी उपलब्ध होताच प्रशिक्षण केंद्र सुरू होईल. याकामी पालकमंत्री अमित देशमुख यांचे विशेष प्रयत्न असल्याचेही जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे यांनी सांगितले.