- एम.जी. मोमीनजळकोट (जि. लातूर) : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. मंगळवारी सकाळी तिरू नदीला पूर आल्याने शेताकडून येणारा २७ वर्षीय तरुण वाहून गेला होता, तसेच रात्री ओढ्यातील पुलावरून पाणी वाहत असल्याने ऑटोने प्रवास करणारे पाच जण वाहून गेले होते. त्यापैकी तिघे बचावले. मात्र, उर्वरित दोघे गायब झाले होते. वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह तब्बल ४० तासांच्या शोध कार्यानंतर गुरुवारी दुपारी १२ वाजता सापडले. मृतदेह पाहून कुटुंबीयांनी आक्रोश सुरू केला.
लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शेती पिकांची दाणादाण उडाली आहे. नदीकाठच्या शेतीस तलावाचे स्वरूप आले आहे, तसेच जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे वाहून जाणाऱ्यांना प्रशासनाकडून आवश्यक ती मदत देऊन वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जवळपास ४८० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एकुलता एक मुलगाही हिरावलाजळकोट तालुक्यातील तिरुका येथील सुदर्शन केरबा घोणशेट्टी (२७) हा अविवाहित आहे. तो मंगळवारी सकाळी ९ वाजता पशुधनास चारा आणण्यासाठी शेताकडे गेला होता. डोक्यावर चाऱ्याचा भारा घेऊन परतताना पाण्याच्या प्रवाहामुळे तो तिरू नदीपात्रात वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. अखेर गुरुवारी दुपारी १ वाजता त्याचा मृतदेह दोन किमी अंतरावरील नदीपात्रात आढळून आला. त्याच्या पश्चात आई- वडील, एक बहीण असा परिवार आहे. विशेषत: तो एकुलता एक होता.
दीड किमी अंतरावर सापडले दोघांचे मृतदेहजळकोट तालुक्यातील पाटोदा खु.- माळहिप्परगा मार्गावरून चालकासह पाच जण असलेला ॲाटो मंगळवारी रात्री ८ वाजता जात होता. ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रवाशांसह हा ऑटो वाहून गेला. दरम्यान, चालक संग्राम सोनकांबळे, विठ्ठल गवळे, बंटी वाघमारे यांना वाचविण्यात यश आले. मात्र, वैभव पुंडलिक गायकवाड (२४, रा. नरसिंगवाडी, ता. उदगीर) व शान ऊर्फ संगीता मुरहरी सूर्यवंशी (३२) हे वाहून गेले. गुरुवारी दुपारी १२ वाजता वैभव गायकवाड व संगीता सूर्यवंशी यांचा मृतदेह दीड किमी अंतरावरील डोंगरगाव साठवण तलाव परिसरात सापडला. वैभव गायकवाड यांच्या पश्चात आई- वडील, भाऊ असा परिवार आहे. सूर्यवंशी यांच्या पश्चात आई- वडील असून त्या अविवाहित आहेत.
एनडीआरएफ, अग्निशमन दलाचे प्रयत्नपुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांच्या शोधासाठी एनडीआरएफच्या पथकास तसेच अहमदपूर आणि उदगीर येथील अग्निशमन दलाच्या बचाव पथकास पाचारण करण्यात आले होते, तसेच या भागातील पट्टीच्या पोहणाऱ्यांचीही मदत घेण्यात आली, असे तहसील प्रशासनाने सांगितले.
मदतीच्या सूचनापुराच्या पाण्यात वाहून गेलेल्यांच्या कुटुंबीयांची माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी गुरुवारी भेट घेतली. कुटुंबीयांचे सांत्वन करून शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ मदत देण्याच्या सूचना केल्या.