चाकूर : येथील तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती आजपासून बायोमॅट्रिक मशीनवर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयात उशिरा येणाऱ्या लेटलतिफांना चाप बसणार आहे. बायोमॅट्रिक मशीनच्या उपस्थितीवरून कर्मचाऱ्यांचे वेतन निघणार आहे.
तालुक्यातील शासकीय कार्यालयातील बहुतांश अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. तसेच पाच दिवसांचा आठवडा झाला असला तरी बहुतांश कर्मचारी सकाळी ९.४५ वा. येत नाहीत. तसेच सायंकाळी ६ .१५ वा.पर्यंत थांबत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे वेळेवर होत नाहीत. प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक मशीनवर घ्यावी. प्रत्येक कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, या मागणीसाठी चाकूर संघर्ष समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सुधाकरराव लोहारे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलसमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल घेत तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालयीन प्रमुख, गटविकास अधिकारी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, भूमी अभिलेख कार्यालय, तालुका कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, वैद्यकीय अधिक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, रजिष्ट्री कार्यालय, महावितरणचे उपविभागीय अभियंता आदींची बैठक घेतली.
तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे निवासाची पत्ते लेखी स्वरूपात तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले. तसेच सर्वांनी मुख्यालयी रहावे. प्रत्येक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमॅट्रिक मशीनवर घ्यावी, अशा सूचना केल्या.
सर्वप्रथम बायोमॅट्रिक मशीन तहसील कचेरीत बसविण्यात आली. गुरुवारपासून बायोमेट्रिक मशीनवरील कर्मचाऱ्यांची उपस्थिती सुरू करून त्यावरून वेतन निघणार असल्याचे सांगितले. कार्यालयीन वेळेत हजर राहणे आता अनिवार्य झाले आहे. महिन्यातून तीनदा उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात होईल. अथवा एक दिवसाची रजा राहील. दरम्यान, तहसीलदार डॉ. बिडवे यांनी शहरातील सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना पत्र पाठविले असून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
तीन दिवसांत अहवाल सादर करा...
शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गुरुवारपासून बायोमॅट्रिक मशीनच्या माध्यमातून उपस्थिती सुरू केली आहे. शहरातील सर्व कार्यालय प्रमुखांना पत्र देऊन यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.
तालुक्याच्या विकासाला चालना देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. जे मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्या विरोधात आमचा लढा सुरू राहणार आहे. तहसील कार्यालयात बायोमॅट्रिक मशीन सुरू करण्यात आली. मुख्यालयी जे कोणी राहत नाहीत, अशा कर्मचाऱ्यांचे पुरावे गोळा करीत आहोत. मुख्यालयी न राहता घरभाडे उचलणाऱ्यांविरुध्द पोलिसात तक्रार दाखल करणार आहोत.
- सुधाकरराव लोहारे, सामाजिक कार्यकर्ते.