जळकोट : गेल्यावर्षी ऐन काढणीवेळी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान झाले. त्यामुळे पीक विमा परतावा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील वांजरवाडा येथील वंचित शेतकऱ्यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्यातील वांजरवाडा येथील शेतकऱ्यांनी गत खरीप हंगामात सोयाबीनचा पीक विमा भरला होता. पीकनिहाय विमा रकमेचा हप्ता बँकेत तसेच ऑनलाईन भरला होता. शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही विमा कंपनीकडून परतावा मंजूर करण्यात आला नाही. तालुक्यातील पिकांचे झालेले नुकसान पाहण्यासाठी कृषिमंत्री हे वांजरवाडा येथे आले असता, सोयाबीनचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे त्यांना दिसले होते.
त्यामुळे शासकीय नुकसानभरपाईबरोबरच पीक विमा देण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले होते. परंतु, अद्याप पीक विमा मिळाला नाही. शासनाने संबंधित विमा कंपनीला विमा परतावा देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी संदीपान आगलावे, सोमनाथ ताकबिडे, गोविंद कदम, नागनाथ टेकाळे, धनंजय आगलावे, प्रवीण आगलावे, संदीप शेवटे, ओमकार टाले, चाँद शेख, संभाजी गोरखे, आदी उपस्थित होते.