गेल्यावर्षीपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आहे. सुरुवातीच्या काळात शहरात काेरोनाची लागण सर्वाधिक होती. आता ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. गतवर्षी कोरोनाची हाळी हंडरगुळीसह परिसरातील गावांतील काहीजणांना लागण झाली होती. सुदैवाने उपचारानंतर बहुतांशजण ठणठणीत झाले. हाळी हंडरगुळी हे बाजाराचे गाव असल्याने येथे नेहमी रेलचेल असते. त्यामुळे संपर्क अधिक असतो. परिणामी, संसर्गाची भीती अधिक असते.
सध्या वातावरणातील बदलांमुळे सामान्य आजारांत वाढ होत आहे. त्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात गर्दी होत आहे. दरम्यान, गुरुवार व शुक्रवारी या दोन दिवसांत २८ जणांना काेरोनाची लागण झाल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सांगण्यात आले. हाळी येथील एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. सुनेचा गुरुवारी रात्री, तर सासऱ्याचा शुक्रवारी सकाळी उदगीर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या कुटुंबातील सर्व व्यक्ती बाधित असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करावी...
हाळी, हंडरगुळी या दोन्ही गावातील बहुतांश नागरिक कोरोनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने चहा स्टाॅल, पानटपऱ्यास बंदी घातली असली, तरी अनधिकृतरित्या ते सुरू आहे. त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतींनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
काळजी घ्यावी...
नागरिकांनी घाबरू नये, गर्दीत जाण्याचे टाळावे, मास्कचा नियमित वापर करावा, स्वत:ची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डाॅ. आकाश पवार यांनी केले आहे.