जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा अभियान
लातूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाकडून सर्व शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त करण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने लातूर जि.प. च्या शिक्षण विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. मार्गदर्शक सूचना शाळांना पाठविण्यात आल्या असून, विविध शाळा यामध्ये उत्स्फूर्त सहभागी होत आहेत. जिल्ह्यात जवळपास २७१७ शाळा आहेत.
जिल्ह्यात महारेशीम शेती अभियान
लातूर : जिल्ह्यात रेशीम शेती करण्यासाठी महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली नावनोंदणी करून रेशीम शेती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे. एक एकर तुती लागवड, कीटक संगोपनगृह बांधकामकरिता अनुदान दिले जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
एमआयडीसी परिसरात विजेचा लपंडाव
लातूर : एमआयडीसी परिसरात रविवारी दुपारी २ ते ३ या वेळेत विजेचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे उद्योगांसह नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. महावितरणच्या दूरध्वनीवर संपर्क साधला असता अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. वीजपुरवठ्यासंदर्भात महावितरणकडे निवेदनही देण्यात आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप एमआयडीसी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
अतुल ठोंबरे पुरस्काराने सन्मानित
लातूर : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून एयू बँकेच्या वतीने अभियंता अतुल ठोंबरे यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी स्वप्नील अजमेरा, पंकज गाडेकर आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
नांदेड रिंगरोडवर खड्डे; वाहनधारक त्रस्त
लातूर : नांदेड रिंगरोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यात आले असल्याचे चित्र आहे. या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. खड्ड्यांमुळे दुचाकीचालकांना त्रास सहन करावा लागतो. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तत्काळ रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ
लातूर : शहरातील क्रांतिज्योती सेवाभावी संस्थेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविले जात आहे. शहरातील श्यामनगर भागात सदरील मोहीम राबविण्यात आली. यावेळी विजय टाकेकर, संजय क्षीरसागर, बालाजी जाधव, अनिल सूरनर, विनोद टाकेकर, चंद्रकांत पेठकर आदींसह क्रांतिज्योती सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कुलदीप देशमुख यांचा लातुरात सत्कार
लातूर : तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभाग नायब तहसीलदारपदी कुलदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून, या नियुक्तीबद्दल गंगाधर जवळे, सिद्धांत गार्डी, बंडाप्पा जवळे, आनंद जवळे, सोमनाथ संकाये, मिलिंद पात्रे यांनी सत्कार केला.