तालुक्यातील वांजरखेडा हे आडवळणाचे गाव असल्यामुळे सर्वसामान्यांच्या सोयी-सुविधेसाठी एसटीही नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांना तालुक्यासह जिल्ह्याच्या ठिकाणी ये- जा करण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे मोठे हाल होत होते. कधी पायपीट करीत तर कधी खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करावा लागत होता. त्यामुळे गावाला बससेवा सुरू व्हावी, यासाठी वांजरखेडा येथील तालुका कृषी सल्लागार समिती सदस्य विठ्ठलराव पाटील यांनी जिल्हा वाहतूक नियंत्रक अभय देशमुख यांना निवेदन देऊन लातूर आगाराची लातूर- शिरूर अनंतपाळ मार्गे वांजरखेडा, फक्रानपूर, हालकी, डोंगरगाव, उजेड, अंकुलगा (स.), येरोळ, येरोळमोड अशी बस सुरू करावी, अशी मागणी केली होती. जिल्हा वाहतूक नियंत्रक शाखेकडून वांजरखेडा ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यात आली असून, गुरुवारी सदरील मार्गाने बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वांजरखेड्यात पहिल्यांदाच लालपरी आली आहे.
बसची सजावट करून पूजन...
वांजरखेडा गावात वर्षानुवर्षे दळणवळणाची व्यवस्था नव्हती. त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत होते. त्यासाठी विठ्ठलराव पाटील यांनी पाठपुरावा केला. लातूर- शिरूर अनंतपाळ मार्गे वांजरखेडा ही बस गुरुवारी सुरू करण्यात आली. गावात बस येताच ग्रामस्थांनी बसची आकर्षक सजावट करून पूजन केले, तसेच वाहक, चालक, वाहतूक नियंत्रक अभय देशमुख, बांधकाम विभागाचे सहायक अभियंता पवार यांच्यासह उपस्थितांचा ग्रामस्थांच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आला.