जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगिण विकासासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी बाला उपक्रमाची संकल्पना मांडली असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यानुसार तालुक्यातील साकोळ जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकांनी बाला उपक्रमाची चांगली सुरुवात व्हावी म्हणून स्वतःच्या वेतनातून एक लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. त्यामुळे बाला उपक्रमास प्रेरणा मिळाली असून, सदरील उपक्रम प्रभावीपणे पार पाडण्यासाठी शाळा स्तरावर संगमेश्वर होनमाळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियोजन बैठक घेण्यात आली.
बैठकीस नूतन सरपंच कमलाकर मादळे, उपसरपंच राजकुमार पाटील, मुख्याध्यापक श्रीमंत मेढे, बंडाप्पा निला, नवनाथ डोंगरे, संग्राम हवा, शरद भिक्का, शिवाजी एरंडे, विठ्ठल वाघमारे यांची उपस्थिती होती. बाला उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन उपसरपंच राजकुमार पाटील यांनी दिले. याप्रसंगी शाळेच्या वतीने उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिरीष कोरे यांनी केले. राम भिक्का यांनी आभार मानले.
इतरांनी प्रेरणा घ्यावी...
साकोळच्या जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये बाला उपक्रमास प्रभावीपणे सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी स्वतः च्या वेतनातून एक लाख रुपये दिले आहेत. साकोळ हायस्कूलच्या शिक्षकांप्रमाणे इतरांनी प्रेरणा घेऊन कामाला सुरुवात करणे आवश्यक आहे, असे गटशिक्षणाधिकारी अनिल पागे यांनी म्हटले.