उदगीर (जि. लातूर) : शहरातील मोंढा रोडवरील बँकेतून काढलेली रक्कम असलेली पिशवी दुचाकीवर ठेवली असता, अज्ञाताने लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी सांगितले, फिर्यादी नरसिंग पांचाळ (रा. संगम, ता. देवणी, हमु. हावगीस्वामी गल्ली, बिदर रोड, उदगीर) यांनी गुरुवारी मोंढा रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून रक्कम काढून पिशवीत ठेवली. बँकेतून बाहेर येऊन ती पिशवी दुचाकीवर ठेवली असता, अज्ञाताने पाठीवर हात ठेवला व तुमचे खाली काही तरी पडले आहे, असे म्हणाला. तेव्हा त्यांनी पाठीमागे वळून खाली पाहिले असता, चोरटा दुचाकीवर ठेवलेली पिशवी घेऊन पसार झाला. दरम्यान, पिशवी गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर पांचाळ यांनी आजूबाजूला पाहिले, मात्र तोपर्यंत चोरटा पळून गेला होता. या पिशवीत एक लाख रुपये, बँक पासबुक, पॅनकार्ड, आधारकार्ड, चेकबुक होते. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.