पोषक आहारासाठी अनुदान मिळेना; गरोदर माता तंदुस्त राहणार कशा? लाभार्थ्यांत नाराजी

By हरी मोकाशे | Published: February 10, 2024 05:27 PM2024-02-10T17:27:15+5:302024-02-10T17:27:42+5:30

प्रधानमंत्री मातृवंदना योजना:नोंदणी झालेल्यांपैकी जवळपास ३ हजार ९७० लाभार्थी महिलांचे अनुदान दोन-तीन महिन्यांपासून खात्यावर जमा झाले नाही.

Lack of subsidy for nutritious food; How can pregnant mothers stay healthy? | पोषक आहारासाठी अनुदान मिळेना; गरोदर माता तंदुस्त राहणार कशा? लाभार्थ्यांत नाराजी

पोषक आहारासाठी अनुदान मिळेना; गरोदर माता तंदुस्त राहणार कशा? लाभार्थ्यांत नाराजी

लातूर : गरोदर महिलांचे कुपोषण रोखण्याबरोबरच त्यांच्या पोटी जन्मणारे अपत्य सुदृढ असावे म्हणून केंद्र शासनाच्या वतीने ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ राबविण्यात येते. दरम्यान, जिल्ह्यात नोंदणी झालेल्यांपैकी जवळपास ३ हजार ९७० लाभार्थी महिलांचे अनुदान दोन-तीन महिन्यांपासून खात्यावर जमा झाले नाही. त्यामुळे पोषक आहाराचे साहित्य कसे खरेदी करावे, असा सवाल करण्यात येत आहे.

कुपोषणामुळे गरोदर महिलेस रक्तक्षय होण्याची अधिक भीती असते. त्याचबरोबर अशा महिलांच्या पोटी जन्मणारे अपत्यही कमी वजनाचे असते. हे कुपोषण थांबावे. त्याचबरोबर काही गर्भवती महिला अगदी बाळंतपणापर्यंत काम करतात; मात्र या कालावधीत त्यांना आरामाची गरज असते; परंतु आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक कारणांमुळे ते अशक्य ठरते. परिणामी, बाळाच्या स्तनपानावर विपरीत परिणाम होतो. अशा महिलांना बुडीत रोजगाराची अंशत: पूर्तता व्हावी म्हणून सन २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ राबविण्यात येते. यंदा या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नोंदणीस उशीर होऊन सप्टेंबरपासून प्रारंभ झाला.

पाच महिन्यांमध्ये दीड हजार महिलांना लाभ...
तालुका - नोंदणी - लाभ

अहमदपूर - ५२६ - १९३
औसा - ६१९ - २७२
चाकूर - २२८ - ११८
देवणी - २४१ - १५१
जळकोट - ३२३ - १४९
लातूर - १४४२ - १६५
निलंगा - ७६५ - १५२
रेणापूर - ४२८ - १३४
शिरुर अनं. - २३० - ५५
उदगीर - ६१९ - ६२
एकूण - ५४२१ - १४५१

दीड हजार बँक खाती आधारलिंक नाही...
केंद्र शासनाच्या वतीने ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ राबविण्यात येत आहे. मार्चअखेरपर्यंत १८ हजार ११ गर्भवती महिलांच्या नोंदीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ५ हजार ४४८ महिलांनी नोंद केली आहे. त्यापैकी १ हजार ४५१ लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम जमा करण्यात आली; मात्र जवळपास दीड हजार लाभार्थ्यांचे आधारकार्ड हे बँक खात्याशी लिंक नसल्याने त्यांचे अनुदान थकीत राहिल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

आशांच्या आंदोलनामुळे नोंदणी थांबली...
आशा स्वयंसेविकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’अंतर्गत गरोदर मातांची नोंदणी थांबली आहे. त्यामुळे उद्दिष्टपूर्ती करणे कठीण होत आहे.

पाच महिने विलंबाने नोंदणी सुरू...
केंद्र शासनाने या योजनेची व्याप्ती वाढविली आहे. योजनेअंतर्गत पहिली मुलगी असलेल्या लाभार्थ्यांस दोन टप्प्यांत पाच हजार, तर दुसरी मुलगी झाल्यास एकदाच सहा हजारांचे अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे. पोर्टलच्या अद्ययावतीकरणामुळे यंदा नोंदणीस जवळपास पाच महिने विलंब झाला आहे.

बँक खाते आधार लिंक करावे...
‘प्रधानमंत्री मातृवंदना योजने’च्या लाभासाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी आधारकार्ड लिंक करून घ्यावे. त्यामुळे योजनेचा लाभ मिळणे सुलभ होईल. उर्वरित लाभार्थ्यांच्या अनुदानासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. लवकर अनुदान जमा होईल.
- डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Lack of subsidy for nutritious food; How can pregnant mothers stay healthy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.