जळकोट : तालुक्यात १० दिवसांपासून कोरोनाचा आलेख उतरला आहे. येथील कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण उपचारासाठी दाखल नाही. तसेच तालुक्यात सध्या ॲक्टिव्ह रुग्ण संख्या केवळ ६ आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे नागरिकांना चिंता लागली होती. मात्र, संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य, महसूल, पंचायत समिती आणि पोलीस विभागाने शासन नियमांची कडक अंमलबजावणी केली. दरम्यान, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सर्व विभागाच्या वारंवार बैठका घेऊन निर्देश दिले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनीही सूचना केल्या. त्यानुसार उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार संदीप कुलकर्णी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे, पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, डॉ. ओमप्रकाश कदम, डॉ. खंडागळे, डॉ. भारती, डॉ. सचिन सिद्धेश्वरे, डॉ. शितल काळे, डॉ. श्रीकांत सोप्पा यांनी तालुका पिंजून काढत जनजागृती केली. तसेच लसीकरण, कोविड चाचण्या वाढविल्या.
तालुक्यातील बाधितांची संख्या पाहून मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात १६० खाटांचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले. संसर्ग कमी झाल्याने सध्या तिथे एकही रुग्ण नाही. तालुक्यात आतापर्यंत १ हजार ६६१ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील १ हजार ६१४ जण उपचारानंतर बरे झाले. उपचारादरम्यान ४१ जण दगावले आहेत. सध्या तालुक्यात ६ ॲक्टिव्ह रुग्ण असून त्यातील दोघे होम आयसोलेशनमध्ये आहेत. १५ मेपासून रुग्ण संख्या घटत आहे.
डेडिकेटेड हॉस्पिटल...
राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या पुढाकाराने जळकोटात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल सुरु झाले. तसेच व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध झाली. गोरगरिबांना तात्काळ आरोग्य सेवा मिळाली. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत. तालुक्यात आतापर्यंत १४ हजार ७३३ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी शासन नियमांचे पालन करावे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स राखावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.